कडोंमपाच्या वसुलीमध्ये ४८ कोटींची घट; उद्दीष्टपूर्तीस कर्मचाऱ्यांना अपयश
कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी करवसुलीसाठी वेगाने प्रयत्न सुरू असल्याचे चित्र एकीकडे रंगविले जात असले तरी मालमत्ता कराच्या माध्यमातून महापालिकेला गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल १०८ कोटी रुपयांचा तोटा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कराची २३४ कोटी ५२ लाख रुपयांची वसुली कर विभागाने केली होती. यावेळी मात्र जेमतेम १८६ कोटी १२ लाख ८७ हजार ४६ रुपये या करापोटी वसूल करण्यात आले आहेत. दोन वर्षांतील मालमत्ता करवसुलीतील तफावत पाहता यावेळी ४८ कोटीने करवसुली कमी झाली आहे.
संपणाऱ्या आर्थिक वर्षांत (मार्च २०१६) मालमत्ता कराचे ३२५ कोटी वसुलीचे लक्ष्य आहे. हा वसुलीचा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी १ एप्रिल २०१५ पासून मालमत्ता कर विभागाने दर महिन्याला २७ कोटी मालमत्ता कराची वसुली करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात कर विभागाने १६ कोटी वसूल केले. त्यामुळे दर महिन्याला ११ कोटी मालमत्ता कर या विभागाने कमी वसूल केला असल्याचे दिसून येत आहे. वसुली लक्ष्याचा विचार करता कर विभागासमोर येत्या ३० दिवसात १३९ कोटी करवसुलीचे आव्हान आहे. वसुलीचे १३९ कोटीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या आठ प्रभागांना दररोज सुमारे ४ कोटी ६३ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करावा लागणार आहे.
दररोज ६९ लाख वसूल
महापालिकेच्या सात प्रभागांमधून दररोज १० ते १८ लाख रुपयांदरम्यान मालमत्ता कराची वसुली केली जाते. म्हणजे एका दिवसाला सात प्रभागांमधून दररोज सुमारे ६९ लाखाचा मालमत्ता कर वसूल केला जात आहे. वसुलीचे हेच प्रमाण येत्या ३० दिवसांसाठी कायम राहिले तर फक्त वाढीव २० कोटी ७० लाखाचा महसूल मार्च अखेपर्यंत जमा होणार आहे. आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे कर्मचारी आणखी १० कोटीची वसुली करू शकतात. परंतु, यामुळे मालमत्ता करवसुलीचा ३२५ कोटीचा लक्ष्यांक पूर्ण होणार नाही. येत्या महिनाभरात वसूल केलेल्या मालमत्ता कराच्या १८६ कोटी रकमेत फक्त सुमारे ३० कोटीची भर पडणार आहे. करवसुलीच्या आकडय़ांची ही सगळी जुळवाजुळव पाहता मालमत्ता कर जेमतेम २१६ कोटी १२ लाख ८७ हजार रुपये जमा होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मालमत्ता करवसुलीत तब्बल १०८ कोटीचा फटका प्रशासनाला यावेळी बसण्याची शक्यता आहे.
१८७ मालमत्ता जप्त
मालमत्ता कराची रक्कम न भरणाऱ्या १८७ जमीन मालक, विकासकांच्या मालमत्ता पालिकेने जप्त केल्या आहेत. २८ मिळकतींना पालिकेने सील ठोकले असून, पालिकेने त्या मालमत्तांवर कब्जा केला आहे. ४६ विकासकांनी मुक्त जमीन कराची थकबाकी भरणा केली नाही. अशा विकासकांच्या ४६ बांधकामांचे काम थांबविण्यासाठी नगररचना विभागाला कळविण्यात आले आहे. सील केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. विकासकांच्या ७९ मिळकतींमध्ये ग्राहकांनी सदनिका खरेदी करू नये यासाठी नगररचना विभागाला कळविण्यात आले आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर थकबाकीदारांनी लवकर कर भरणा करावा, असे आवाहन आयुक्त ई. रवींद्रन यांनी केले आहे.
कर निर्धारक व्यग्र
अधिक माहितीसाठी कर निर्धारक व संकलक अनिल लाड यांच्या भ्रमणध्वनीवर, त्यांच्या दालनातील दूरध्वनीवर सतत संपर्क केला. त्यांना संपर्क करण्यासाठी भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठविला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या महिन्यात लाड यांनी लक्ष्य पूर्ण करण्याचे सांगितले होते.