तीन दिवसांत १२ नगरसेवकांवर गंडांतर?

बेकायदा बांधकामप्रकरणी कल्याण-डोंबिवलीतील सर्वपक्षीय नेत्यांना महापालिका आयुक्त ई.रवींद्रन यांनी चपराक लगाविण्यास सुरुवात केली आहे. बेकायदा बांधकामांसंबंधी ठपका ठेवण्यात आलेल्या नगरसेवकांविषयी संयमाची भूमिका घ्यावी, असे आर्जव करत दोन दिवसांपूर्वी रवींद्रन यांची भेट घेणाऱ्या भाजप आमदारांना आयुक्तांनी वाकुल्या दाखविल्या असून काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांच्याविरोधात कारवाई करत ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, आठवडय़ाभरात आणखी १२ नगरसेवकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

बेकायदा बांधकामांशी संबंधित १२ नगरसेवकांना येत्या दोन ते तीन दिवसांत नोटिसा बजावून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. भाजप सरकारच्या दबावामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याची टीका शिवसेनेच्या नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केल्यामुळे या पक्षात कमालीची अस्वस्थता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सचिन पोटे यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने त्यांनाही महापालिकेची निवडणूक लढविता येणार नाही. पोटे हे काँग्रेसचे नेते संजय दत्त यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचे पद रद्द झाल्याने दत्त यांनाही मोठा झटका बसला असून ही कारवाई आकसाने करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाजपला धक्का

नगरसेवकांवरील कारवाई करण्यापूर्वी त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ द्यावा, असे कारण पुढे करत आयुक्तांची भेट घेणाऱ्या भाजप आमदारांनाही रवींद्रन यांनी धक्का दिला आहे.

काँग्रेसची ओरड

बेकायदा बांधकामांमध्ये बारा जण दोषी असूनही फक्त काँग्रेसचे सचिन पोटे यांच्यावरच कारवाई का केली. अन्य अकरा जणांची प्रशासन कशासाठी पाठराखण करीत आहे, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे.