ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी आणखी १२ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ३५४ वर पोहचली आहे. आतापर्यंत ९ रुग्णांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत.

बुधवारी प्राप्त झालेल्या १२ पॉजिटीव्ह अहवालांपैकी ५ रुग्ण हे याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. उर्वरित रुग्णांना मुंबईत प्रवासादरम्यान करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. गेल्या काही दिवसांमध्ये शहराबाहेर प्रवास न केलेल्या व्यक्तींनाही करोनाची लागण झाल्याचं लक्षात येत असल्यामुळे प्रशासनासमोरील चिंतेत वाढ होते आहे. आतापर्यंत १७४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले असून १७१ रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अद्याप ५७ जणांचा अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. बदलापूर शहरातील अनेक व्यक्ती या अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहे. यामुळेच शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचं समोर आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने ६९ रहिवासी संकुल प्रतिबंधीत केली आहेत.