प्राणवायूच्या खाटांची संख्याही शंभरच्या घरात; गेल्या काही दिवसांपासून मागणीत वाढ

ठाणे : ठाणे शहरातील करोनाबाधितांची संख्या स्थिर होत असली तरी गंभीर अवस्थेतील रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांत प्राणवायू आणि अतिदक्षता विभागांतील खाटांची संख्या झपाटय़ाने कमी झाली असून आजघडीला प्राणवायूच्या १०१ तर अतिदक्षता विभागातील ८० खाटा शिल्लक राहिल्या आहेत. महापालिकेने नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालये प्राणवायूअभावी बंद अवस्थेत आहेत. पुढील १० दिवस तरी या खाटा सुरू करणे शक्य नसल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत १ लाख ७ हजार ६१४ करोना रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सद्यस्थितीत १५ हजार ९२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ३ हजार २६१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरातील पालिका तसेच खासगी करोना रुग्णालयामध्ये एकूण ४ हजार ४६० खाटा उपलब्ध

असून त्यापैकी ३ हजार २६१ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहे. ठाणे शहरात दररोज १४०० च्या आसपास करोना रुग्ण आढळून येत असून हा आकडा गेल्या आठ दिवसांपासून स्थिर असल्याचे चित्र आहे. असे असले तरी दुसरीकडे मात्र शहरात प्राणवायू आणि अतिदक्षता विभागातील खाटांची मागणी वाढू लागल्याचे चित्र आहे.

तीन दिवसांपूर्वी म्हणजेच १७ एप्रिल रोजी पालिका आणि खासगी रुग्णालयातील एकूण ४ हजार ६६६ पैकी १ हजार २० खाटा (२२ टक्के) शिल्लक होत्या. त्यामध्ये साध्या खाटा ४७५ (४१ टक्के), प्राणवायू खाटा ३०३ (११ टक्के), अतिदक्षता विभागातील खाटा २४२ (२९ टक्के) आणि व्हेंटिलेटरच्या खाटा ९२ (३५ टक्के) होत्या. तर, २० एप्रिल रोजी ४ हजार ४६० खाटांपैकी १ हजार १९९ म्हणजेच २७ टक्के खाटा शिल्लक आहेत. त्यामध्ये साध्या खाटा १ हजार १८ (४७ टक्के), प्राणवायू खाटा १०१ (६ टक्के), अतिदक्षता विभागातील खाटा ८० (१२ टक्के) आणि व्हेंटिलेटरच्या खाटा

११८ (४१ टक्के) आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत अतिदक्षता विभागाच्या खाटांमध्ये १७ टक्क्य़ांनी तर प्राणवायु खाटांमध्ये ५ टक्क्य़ांनी मागणी वाढली असून सद्यस्थितीत अतिदक्षता विभागात १२ टक्के तर प्राणवायूच्या केवळ ६ टक्केच खाटा शिल्लक आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल करोना रुग्णालयामध्ये दररोज २० टन प्राणवायूच्या क्षमतेची टाकी असून त्यामध्ये दोन दिवसातून

३ वेळा प्राणवायूचा भरणा करावा लागतो. त्याचबरोबर शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. शहरात सद्यस्थितीत ३ हजार २६१ सक्रिय रुग्ण असून त्यामध्ये ५७० जोखमीचे रुग्ण आहेत. अतिदक्षता विभागात ५७० तर, व्हेंटिलेटरचे १७२ रुग्ण आहेत.

अधिक ऑक्सिजनची मागणी

ठाणे जिल्ह्य़ात १९० ते २०० मेट्रीक टन प्राणवायू पुरवठा होतो. पण, सध्या २७५ ते ३०० मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता आहे. कारण, जिल्ह्य़ात सध्या ५६ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १८ ते १९  टक्के रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासत आहे. एकूण सक्रिय रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्राणवायूसाठी दहा टक्के कोटा मंजूर केला असून तो पुरेसा नाही. त्यामुळे जिल्ह्य़ाला वाढीव प्राणवायूचा पुरवठा करण्याची मागणी ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली होती.