कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत १२ हजार ४९ मतदारांनी मतदार यादीतील एकही उमेदवार पसंत नाही म्हणून ‘नोटा’ मताधिकाराचा वापर केला आहे. प्रत्येक प्रभागात किमान ५० तर जास्तीत जास्त १२५ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत काही उमेदवारांना अगदी निसटत्या मतांनी पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यामुळे नोटाचा वापर करणाऱ्या मतदारांच्या नावाने हे उमेदवार खडे फोडू लागले आहेत.

मतदार यादीतील एकाही उमेदवाराला मतदान द्यायचे नसेल तर मतदान यंत्रात मतदाराला नकाराधिकार दर्शवण्यासाठी नोटा नावाचे बटन ठेवले आहे. या बटनाचा वापर करून मतदार उमेदवाराला मत न देता नकाराधिकाराचा वापर करू शकतो. कल्याण डोंबिवली पालिकेच्या १२२ प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात किमान ५० ते जास्तीत जास्त १२५ मतदारांनी नोटा बटनाचा वापर करून उमेदवारांप्रती असलेली नाराजी व्यक्त केली आहे. एका प्रभागात किमान १२ हजार मतदार आहेत. प्रत्येक प्रभागातील उमेदवार किमान २ ते ३ हजार मतांनी निवडून आले आहेत.