दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. मेढे गावातील पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांत जाण्यासाठी हा पूल हा एकमेव मार्ग आहे. प्रशासनाने या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून येथील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने वसई-विरार शहरासह वसईच्या ग्रामीण भागाला अक्षरश: धुतले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर ओसरला असला तरी तानसा नदीच्या पात्राने अद्यापही धोकादायक पातळी सोडलेली नसल्याने नदीकिनारी किंवा ज्या सखल भागांत पाणी साचले आहे, त्या ठिकाणी नागरिकांना न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत एकूण पावसाची नोंद २०८४ मिलिमीटर झाली आहे, तसेच येत्या ४८ तासांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वसई पूर्व परिसरातून वाहणाऱ्या तानसा नदीचे पात्र मंगळवारी दुथडी भरून वाहत होते. नदीवर असलेल्या पांढरतारा पुलावरून अद्याप पाणी ओसरले नसल्याने १२ गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यात सायवन, शिरवली, पारोळ, उसगाव, चांदीप, कोपर, खानिवडे, नवसई, हेदवडे, चिमने या गावांचा समावेश आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडी

पाऊस नसला तरी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ससुपाडा या ठिकाणी महामार्गावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. बुधवारी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस दिवसभर वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत होते.

जे. पी.नगरमध्ये पाणी शिरले

विरार पश्चिमेकडील बोळिंज येथे जे. पी.नगर या झोपडपट्टी परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी शिरले. या ठिकाणी जवळपास ६० ते ६५ घरे आहेत. येथील रहिवाशांना अग्निशामक दलाच्या जवानांनी पद्मावती हॉलमध्ये सुरक्षित हलविले.

नागरिकांना ‘पाऊस’फटका

नालासोपारा येथील संतोष भुवनसारख्या सखल परिसरात, पूर्वेकडील पुलाखाली आणि मुख्य रस्त्यावरही पाणी साचल्याने त्याच पाण्यातून नागरिकांना वाट काढत जावे लागत होते.

वालीव येथील औद्योगिक वसाहतीकडे जाणारा रस्ता, गोलानी या ठिकाणी पाणी साचल्याने येथे जाणाऱ्या वाहनचालकांना त्याचा फटका बसला. अर्नाळा बेट किनाऱ्यावरील झोपडय़ांना लाटांनी झोडपले.

वसईत वादळी वारे व विजेचा मारा यांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते.

पावसाने वसई सनसिटी येथील रस्ता पाण्याखाली गेला आहे.

वसई सनसिटी रस्ता हा निर्मळ, भुईगाव, कळंब, गास इत्यादी ठिकाणाहून येणाऱ्या रहिवाशांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. नाळा तलाव भरून वाहू लागल्याने रस्त्यावर पाणी जमा झाले होते.

सत्पाळे-राजोडी रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील गावकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले. पूर्वेकडीलच मिठागर येथे वस्तीत पाणी साचले होते.