दोघांची परिस्थिती गंभीर; बेतवडेमध्ये बांधकामावेळी दुर्घटना
दिव्याजवळील बेतवडे येथे बांधकामस्थळी झालेल्या सुरुंग स्फोटात तेथे काम करत असणारे कामगार जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. कामगारांना सुरुंग स्फोटाची पूर्वसूचना न दिल्याने बांधकामस्थळावरचे बारा कामगार जखमी झाले असून यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर आहे. गंभीर जखमींना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींना उपचार करून सोडून दिल्याचे पोलिसी सूत्रांकडून सांगण्यात आले.
दिव्याजवळील बेतवडे गावाच्या हद्दीत रुणवाल कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या बांधकामस्थळी गेल्या दोन महिन्यांपासून इमारतीचा पाया खणण्यासाठी दगड फोडण्याचे काम सुरू आहे. हे दगड फोडण्यासाठी कंपनीतर्फे सुरुंग स्फोटाचा वापर करण्यात येत होता. या स्फोटांसाठीची परवानगीही कंपनीकडे होती. मात्र रविवारी बांधकामस्थळी कोणतीही पूर्वसूचना न देता सुरुंग स्फोट घडवून आणणाऱ्या पथकाने स्फोटाची तयारी केली. या वेळी प्रत्यक्ष बांधकामस्थळी दहा ते बारा कामगार काम करत होते. काही वेळानंतर कामगारांना स्फोट होणार आहे, अशी वर्दी देण्यात आली, मात्र तेव्हा उशीर झाला होता. बांधकामस्थळाहून दूर जाण्यापूर्वीच झालेल्या दगडांच्या स्फोटात कामगार जखमी झाले. त्यातील शामसुंदर चौधरी (३५) आणि मोहम्मद आरिफ शेख (३२) हे दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ डोंबिवलीतील नेपच्यून व डॉल्फिन या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आहे.
बांधकाम कंपनीवर गुन्हा
दरम्यान, स्फोट घडवून आणताना हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याबद्दल भारतीय स्फोटके अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे मुंब्रा पोलीस ठाण्याकडून स्पष्ट करण्यात आले.