X

वसईतील १२३ गणेश मंडळांना परवानगी नाही

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करताना उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.

नियमांची पूर्तता न केल्याचा फटका; केवळ २६४ मंडळांना परवानगी

गणेशोत्सव मंडळांना परवागनी देताना पालिकेने कडक नियमांची तपासणी केल्याने १२३ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. पालिकेकडे ३८७ अर्जापैकी केवळ २६४ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. मंडळांनी अग्नितपासणी करण्याकडेही दुर्लक्ष केले असून अग्निशमन विभागाकडे केवळ ६० अर्ज आले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करताना उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व महापालिांना दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने विभाग स्तरावर बैठका घेऊन सर्व मंडळांना त्याची माहिती दिली होती. मात्र तरीही अनेक मंडळांनी नियमांची पूर्तता केलेली नाही. वसई-विरार महापालिकेकडे मंगळवापर्यंत एकूण ३८७ अर्ज आले होते. त्यापैकी तपासणी करून २६४ मंडळांना परवानग्या दिल्या आहेत तर नियमांती पूर्तता न करणाऱ्या १२३ मंडळांना परवानगी नाकारली आहे. त्यांची परवानगी प्रलंबित ठेवली असून पूर्तता केल्यानंतर दिली जाणार आहे. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलिसांकडून परवागनी घेतल्यानंतर पालिकेकडून परवानगी मिळते. त्यासाठी मंडळाची नोंदणी आवश्यक असते. मात्र सार्वजनिक मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष केलेले आहे.

अग्निसुरक्षेकडेही दुर्लक्ष

महापालिकेची परवानगी मिळाल्यानंतर मंडप उभारायला परवानगी मिळते आणि मग अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला घ्यावा लागतो. मात्र पालिकेकडून परवानगी मिळालेल्या २६४ मंडळांपैकी

केवळ ६० मंडळांनीच अग्नितपासणीसाठी अग्निशमन विभागाकडे अर्ज केला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. अग्निसुरक्षा महत्त्वाची असताना या गंभीर बाबीकडे सार्वजनिक मंडळ दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे.

आम्ही सर्व मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना केल्या होत्या. ज्यांनी नियमांचे पालन केलेले नसेल त्यांना परवानगी मिळणार नाही.

-रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त