कौसा परिसरातील पालिका शिक्षणाचे भीषण वास्तव; तीन मजली इमारतीच्या ५२ खोल्यांत सगळ्या शाळांचा कारभार

६ ते १४ वयोगटांतील प्रत्येक मुलाला नजीकच्या शाळेत शिक्षण घेण्याची संधी देणाऱ्या शिक्षणहक्क कायद्याचे कोडकौतुक सुरू असले तरी ठाण्यातील मुंब्रा-कौसा परिसरात विद्यार्थ्यांना आठ किलोमीटरची पायपीट करून शाळा गाठावी लागत आहे. बरं, ही शाळा तर कसली? एका तीन मजली इमारतीतील ५२ खोल्यांमध्ये १३ शाळा भरत असून त्यात ६५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अपुऱ्या वर्गखोल्या, इमारतीच्या छताला लागलेली गळती, अपुरा शिक्षकवर्ग, प्राथमिक सुविधांची वानवा असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. हे सगळे कमी की काय, तर पालिकेकडून विद्यार्थ्यांना पुस्तके, शालेय साहित्याचे वाटपही वेळेत होत नसल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या गरीब वस्त्यांमधील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशीच खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

खासगी शाळांचे प्रस्थ वाढल्यामुळे महापालिका शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र शहरी भागातील महापालिका शाळांमध्ये दिसत असले तरी मुंब्रा, कौसा, दिवा या आणि अशाच गरीब वस्ती असलेल्या भागातील विद्यार्थ्यांची पालिका शाळांमध्ये मोठी गर्दी असते. कौसा येथील वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या शाळा नादुरुस्त झाल्यानंतर या सगळ्या शाळा एकाच इमारतीत भरण्यास सुरुवात करण्यात आली असून आता हा प्रकार कायमस्वरूपी लागू झाला आहे. शाळेच्या जागांवर आता फेरीवाल्यांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

कौसा परिसरात ८ ते १० किलोमीटर परिसरात शाळेची केवळ एक इमारत असून काही मुले चालत तर काही मुले रिक्षाने शाळेत येतात. या भागात महापालिकेच्या १३ शाळा आहेत. शाळा क्रमांक ३१, ४०, ९९, १२५, १००, १०८, १०६, ९६, १०४, ११७, १०९, ७३ अशा शाळा असून त्यामध्ये साडेसहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसाठी ५२ खोल्यांची तीन मजल्याची इमारत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तीन सत्रांमध्ये चार-चार शाळा भरतात.

शिक्षकांच्या कमतरतेमुळे वेगवेगळ्या इयत्ताच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागते. एक वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत यंदाच्या पावसाळ्यात गळू लागली आहे. जागोजागी इमारतीला तडे गेल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. महापालिकेकडून पुरविण्यात येणारे शैक्षणिक साहित्य वेळेवर येत नसल्याने मुलांना त्याचा फटका सहन करावा लागतो. केवळ अर्धी पुस्तके विद्यार्थ्यांना मिळतात. पाऊस संपल्यानंतर रेनकोट आणि थंडी संपल्यानंतर स्वेटर्स विद्यार्थ्यांना दिले जातात. गणवेश तर शाळा संपण्याच्यावेळी मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा शाळेत लाभ घेता येत नाही. एकाच ठिकाणी १३ शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

तेथील १३ शाळांचे प्रशासन प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक दिवशी एका शाळेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश प्रक्रिया राबवण्यास शाळेच्या इमारतीमध्ये कार्यालय उघडतात. त्यामुळे विद्यार्थी त्या दिवशी उपलब्ध असलेल्या शाळेत प्रवेश घेतात.

अपुरे शिक्षक आणि अपुरे कर्मचारी..

तीस मुलांमागे एक शिक्षक असा निकष असला तरी तरी ६५०० विद्यार्थ्यांमागे येथे केवळ १३० शिक्षक आहेत. तर १३ शाळांना मिळून अवघे दोन मुख्याध्यापक असून अन्य ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक आहेत. तर सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी आणि शिपायांची संख्याही जेमतेम २० आहे.

कौसा परिसरात नव्यानेच इमारत बांधण्यात आलेली असून त्यामुळे इथे आणखी शाळा बांधण्याचा विचार सध्या तरी महापालिकेचा नाही. या भागातील मागणीनुसारच ही शाळा नव्याने बांधण्यात आलेली आहे. याविषयी आमचे वरिष्ठ योग्य माहिती देऊ शकतील.

– ऊर्मिला पारधे, शिक्षण अधिकारी