वसई : करोना विषाणूशी झुंज देत असलेले वसईतील प्रशासन ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा सामना करण्यास सज्ज झाले आहे. महापालिका, पोलीस, महसूल तथा मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी  वसईतील पाचूबंदर किनारपट्टीला भेट देऊन या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली. वसईतील १३ मच्छीमार बोटी अद्यापही समुद्रात असून त्यांना सुरक्षितरीत्या किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती या वेळी मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आली.

३ आणि ४ मे रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळ वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्य़ाच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून त्यानुसार अर्नाळा किल्ला, अर्नाळा गाव, कळंब, राजोडी, पाचूबंदर—किल्लाबंदर आदी किनारपट्टीवरील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवर कच्च्या घरात राहणाऱ्या घरांना उधाणाच्या लाटांचा फटका बसून जीवितहानी होऊ  नये यासाठी या घरांतील नागरिकांना पक्क्या वास्तूत किंवा गावातील शाळांत स्थलांतरित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मंगळवारी दुपारी वसई—विरार शहर महापालिका आयुक्त डी. गंगाधरन, अपर पोलीस विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील, प्रांत अधिकारी स्वप्निल तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे, वसई पोलीस निरीक्षक अनंत पराड, मत्स्यव्यवसाय खात्याचे अलगिरे, बावीस्कर आदी अधिकाऱ्यांनी पाचूबंदर तसेच अर्नाळा किनाऱ्याला भेट देऊन या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली. निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा किनारपट्टीला बसणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले.

वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता

चक्रीवादळामुळे महावितरण कंपनीच्या मालमत्तेस भरपूर प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. विजेचे खांब तसेच वीजवाहिन्या कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे चक्रीवादळाच्या काळात दीर्घ कालावधीसाठी वीजपुरवठा खंडित होऊ  शकतो, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मच्छीमारांच्या सहकारी संस्थांशी समन्वय साधून किनाऱ्यावरील स्थितीची माहिती घेत आहोत. वसईतील १३ बोटी समुद्रात आहेत. त्यांच्याशी बिनतारी संदेश यंत्रणेवरून संपर्क झालेला असून त्या परतीच्या मार्गावर आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत या बोटी किनाऱ्यावर येतील.

— अजिंक्य पाटील, साहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, पालघर