21 October 2020

News Flash

भिवंडीत इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू

ढिगाऱ्याखाली २५ ते ३० जण अडकल्याची भीती

(संग्रहित छायाचित्र)

भिवंडी येथील कामतघर भागात सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात सात मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत २५ जण जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी २५ ते ३० जण अडकल्याची भीती व्यक्त होत असून, रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

भिवंडी येथील कामतघर भागातील पटेल कम्पाऊंड परिसरात जिलानी नावाची तीन मजली इमारत होती. सुमारे ४५ वर्षे जुन्या या इमारतीत ४० कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती. सोमवारी पहाटे या इमारतीचा अर्धा भाग कोसळला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर नारपोली पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, ठाणे आपत्ती निवारण दल, भिवंडी अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

या दुर्घटनेप्रकरणी इमारतीचे बांधकाम करणारे सय्यद जिलानी यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या यंत्रमाग कारखान्यामुळे इमारतीचे बांधकाम कमकुवत होऊन ही दुर्घटना घडल्याचा दावा रहिवाशांकडून करण्यात येत आहे. इमारतीच्या तळमजल्याजवळ मलवाहिनीचे पाणी साचत होते. त्यामुळेही दुर्घटना घडली असावी, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

मदतकार्यात अडथळे

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, ठाणे आपत्ती निवारण दल, भिवंडी अग्निशमन दल या सर्व यंत्रणा दुर्घटनेनंतर अध्र्या तासात तिथे पोहचल्या. पण, दुर्घटनाग्रस्त इमारत अतिशय दाटीवाटीच्या भागात आहे. इमारतीकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने तिथे जेसीबी, रुग्णवाहिका नेण्यात अडचणी येत होत्या. तसेच ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या मृतांना आणि जखमींना ५०० मीटर अंतरावर उभ्या केलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत उचलून न्यावे लागत होते.

नोटिसा देऊनही घरे रिकामी करण्याकडे दुर्लक्ष

या इमारतीला काही ठिकाणी तडे गेले होते. त्यामुळे इमारतीचे मालक आणि बांधकाम करणाऱ्या सय्यद जिलानी यांना फेब्रुवारी महिन्यात भिवंडी महापालिकेने नोटीस बजावली होती. या इमारतीतील घरे रिकामी करावीत, असे या नोटिशीत म्हटले होते. मात्र, जिलानी यांनी ही नोटीस स्वीकारली नव्हती. तसेच इमारतीतील रहिवाशांनीसुद्धा ही नोटीस घेतली नव्हती. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये २४ तासांत इमारत रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने बजावली. त्यानंतरही नागरिकांनी घरे रिकामी केली नव्हती, असे महापालिकेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पाच लाखांची मदत

* इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

* जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे जाऊन शिंदे यांनी जखमींची विचारपूस केली.

* या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांवर कारवाई : जिलानी इमारत दुर्घटनाप्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती -३  साहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले. तसेच या दुर्घटनेबाबत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये साहाय्यक नगररचनाकारांचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:23 am

Web Title: 13 die in bhiwandi building accident abn 97
Next Stories
1 यंत्रमाग कारखान्यांमुळे इमारतींना धोका?
2 शहापूरमध्ये २४ तारखेपासून आठवडाभर जनता कर्फ्यू
3 मुंबई, ठाण्यासह पुण्यात उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
Just Now!
X