भगवान मंडलिक

१३५ दिवसांचे भात पीक ९० दिवसांत; शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

शहापूर तालुक्यातील अनेक खेडय़ांमध्ये काही शेतकऱ्यांनी लावलेली १३५ दिवसांत तयार होणारे भात पीक ९० दिवसांत तयार झाल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. शेतांमध्ये चिखल असताना भात कापायचे कसे, या चिंतेत शेतकरी आहेत.

भात बियाणे उत्पादक कंपन्यांकडून स्थानिक कृषी विक्री केंद्रांकडे विक्रीसाठी आलेली भात बियाणांची पाकिटे दोन हजार रुपयांना शेतकऱ्यांनी खरेदी केली. बियाणांच्या पाकिटावर १३० ते १३५ दिवसांत तयार होणारे भात पीक असे उल्लेख आहेत. मात्र  भातपीक सरासरी कालावधीच्या आधीच पोसावण्यास सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या भात बियाणाच्या पाकिटावर १३५ दिवसांत तयार होणारे पीक असा उल्लेख असल्यामुळे शेतकऱ्यांनी गर्वे पीक म्हणून संबंधित शेताच्या खाचरात या बियाणाच्या पिकाची लागवड केली. वर्षांनुवर्षांचा भात पीक लोंब्यांवर (लोंगवा) येण्याचा काळ शेतकऱ्यांना माहिती असतो. यावेळी गर्वे जमिनीत लावणाऱ्या पिकाला १३५ दिवसांऐवजी ९० दिवसांत लोंब्या (भात दाण्याचा तुरा) आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हे पीक साधारणपणे दिवाळीपूर्वी तयार होते, असे एकनाथ पडवळ म्हणाले. बियाणे विक्री केंद्रचालकांनी अकाली पिकाची एक तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांनी तात्काळ घाबरून जाऊ नये. लोंबी बाहेर आली तरी त्यात पक्का दाणा तयार होण्यास पुढील कालावधी लागेल, असे सांतवन विक्रेत्यांकडून केले जात आहे. बियाणे लागवडीतून आपली फसवणूक झाली आहे, असे शेतकऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी तशी तक्रार आपल्याकडे करावी. थेट बियाणे उत्पादक कंपनीशी संपर्क करून यासंदर्भात खुलासा मागवून घेतो, असे ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

भात पीक बियाणे कंपनीने दिलेल्या मुदतीपेक्षा अगोदर लोंब्या (भात तुरा) आल्या असतील, यामध्ये फसवणूक झाली आहे, असे शेतकऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी.

-एम. डी. सावंत, जिल्हा कृषी अधिकारी ठाणे</p>