वसई-विरार महापालिकेच्या १३८ उद्यानांचे सुशोभीकरण

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील १३८ उद्यानाचे सुशोभीकरण होणार असून या ठिकाणी गवत लावून मोठय़ा प्रमाणात हिरवळ करण्यात येणार आहे. दुर्लक्षित उद्यानांच्या सुशोभीकरणाचा विषय सर्वसाधारण सभेत नुकताच मंजूर झाला असून वसई-विरार पालिका हद्दीतील उद्याने हिरवाई झळकणार आहेत.

महापालिका क्षेत्रात एकूण १३८ उद्याने आहेत. तर गेल्या आठ वर्षांत महापालिकेनेही काही उद्याने नव्याने विकसित केली आहेत. या सर्व उद्यानांत शोभिवंत रोपे, हिरवळ लॉन, लाल माती यासह सुशोभीकरण करण्यात यावे व तीन वर्षे देखभाल निगा राखण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी सर्वसाधारण सभेसमोर विषय घेण्यात आला. यासाठीचा खर्च २०१८-१९, २०१९-२० व २१ या तीन वित्तीय वर्षांच्या अर्थसंकल्पातील विकास निधीतून भागविण्यात येईल, असे प्रशासनाने नमूद केले होते.

नऊ प्रभागांत असलेली आणि दुर्लक्षित असलेली अशा एकूण १३८ उद्यनांच्या सुशोभीकरणाचा विचार पालिकेने केला आहे. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत याकडे लक्ष वेधण्यात आले.

सध्या उद्यानांमध्ये नवीन खेळणी लावण्याचे काम आणि तुटलेले बाक दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच सुशोभीकरणाच्या पुढच्या टप्प्यात उद्यानांमध्ये विविध प्रकारची शोभिवंत झाडे, फुलझाडे, गवत लावण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. तसेच वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात दुभाजकांमध्ये लागवड केलेली शोभिवंत झाडे संगोपन व देखभाल करण्यासाठी आणि सुशोभित न केलेल्या दुभाजकांत रोपे लावण्याचा विषयावरदेखील सभेत चर्चा झाली. शहरातील रस्त्याच्या दुभाजकांत रोपे लावून त्यांना शेणखत, माती पाणी देणे, तण काढणे आदी कामांबाबत विषय मांडण्यात आला.  उद्याने आणि दुभाजकांत हिरवळ तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाने हा विषय मांडला असल्याने शहरात हिरवाई झळकणार आहे.

महानगरपालिका हद्दीतील दुर्लक्षित उद्यानांचेदेखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच या उद्यानांच्या देखभालीची जबाबदारी पालिका महिला बचत गटाकडे देण्यात येत असून नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या उद्यानांमुळे या महिलांचे सबलीकरणदेखील होणार आहे.

राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महानगरपालिका