१४ आरोपींना न्यायालयीन कोठडी

भाईंदर : मद्यधुंद अवस्थेत धांगडधिंगा घालणाऱ्या तरुणांना अटकाव करण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १४ आरोपींना न्यायालयाने १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेले हे तरुण सुखवस्तू कुटुंबांतील असून यातील काहीजण उच्चशिक्षित असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मीरा रोडच्या पूनम गार्डन परिसरातील समृद्धी या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील घरात मंगळवारी पहाटे पाचपर्यंत आरोपींनी अक्षरश: धिंगाणा घातला होता. आरोपींवर नशेचा अंमल इतका प्रचंड होता की त्यांची मजल चक्क पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण करण्यापर्यंत गेली. यातील एका पोलीसाचे कपडेही फाडण्याचा प्रकार झाला. आरोपींमधील महिला तरुणांना मारहाण करण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या ही गोष्ट संतापजनक होती. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी सुखवस्तू कुटुंबातील आहेत, शिवाय यातील काहीजण उच्चशिक्षितहीआहेत. एक आरोपी महाविद्यालयात शिक्षण घेत असून उर्वरित आरोपी हे नोकरी तसेच व्यवसाय करणारे आहेत आणि एक आरोपी इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात आहे. एका आरोपीने तर एका हिंदी दैनिकाचा पत्रकार असल्याचे सांगून पोलीसांवर दबावही टाकण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी पोलिसांना मारहाण झाल्याची घटना समाजमाध्यामंवरून शहरात वाऱ्यासारखी पसरली. आरोपींची धरपकड झाल्याचे समजताच त्यांच्या बाजूने काही राजकीय पक्षाचे नेते, आजी-माजी नगरसेवक यांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु पोलिसांमोर त्यांचा काहीच डाळ शिजली नाही. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असल्याने राजकीय नेत्यांनी आपली भूमिका बदलत पोलसांची भूमिका योग्य असल्याचे घूमजाव केले. मारहाणीची घटना घडली त्यावेळी अटक झालेल्या आरोपींसोबत आणखी काही जणांचा सहभाग होता का आणि गडबडीचा फायदा घेत काहीजण फरार झाले का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

काय घडले?

मीरा रोडच्या पूनम गार्डन परिसरातील समृद्धी या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील घरात मंगळवारी रात्रभर काही तरुणांनी धिंगाणा घातला होता. सोसायटीतील काही सदस्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर मीरा रोड पोलीस ठाण्यातील पोलीस वाहनचालक प्रदीप गोरे आणि पोलीस शिपाई हरीश्चंद्र झांजे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घरात १२ ते १४ जण मोठय़ा आवाजात गाणी लावून मद्यपान करत असल्याचे पोलिसांना दिसून आले.  सोसायटीमधील रहिवाशांची तक्रार असल्याने आवाज बंद करा, असे पोलिसांना सांगताच घरातील तरुणांचे पित्त खवळले. त्यांनी दोघा पोलिसांना घरात घेऊन बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रदीप गोरे यांनी आपल्या मोबाइलवरून मीरा रोड पोलीस ठाण्याला कळवले आणि सुरू असलेल्या प्रकाराची कल्पना दिली. त्या वेळी पोलीस ठाण्यातील प्रमोद केंद्रे तातडीने मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले, परंतु त्यांनाही घरात घेऊन मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नयानगर आणि काशिमीरा पोलीस ठाण्यांतील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची कुमक मागवून घेतली आणि १४ जणांना अटक केली.