ठाणे जिल्ह्यातील महत्वाचं उप-नगर म्हणून ओळख असलेल्या बदलापूर शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ थांबायचं नाव घेत नाहीये. गुरुवारी आणखी १४ जणांना करोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. काही दिवसांपूर्वीच बदलापूर शहराने करोना बाधित रुग्णांच्या संख्येची शंभरी गाठली होती. नव्याने भर पडलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण मॅरेथॉन नगरी, शिवाजी चौक, कात्रप रोड, MIDC भाग इकडचे रहिवासी आहेत. आज प्राप्त झालेल्या २० अहवालांपैकी १४ जणांचे अहवाल हे पॉजिटीव्ह तर ६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

शहरात आतापर्यंत ३ जणांनी आपले प्राण गमावले असून, ९४ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ४१ जणं करोनावर यशस्वी मात करुन घरी परतलेली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने शहरातील ४२ रहिवासी भाग प्रतिबंधित केलेले आहेत. बदलापूर, उल्हासनगर, ठाणे आणि मुंबई येखील रुग्णालयात शहरातील रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बदलापूर शहरात अनेक लोकं अत्यावश्यक सेवेत मोडत असून रोजच्या कामासाठी त्यांचा मुंबईला प्रवास सुरु आहे. यामुळे प्रत्येक दिवशी करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.