X

भाईंदरमधील पालिका शाळांचा कायापालट

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या एकूण ३५ शाळा आहेत.

उद्योगांच्या दायित्वातून १४ शाळांचे सुशोभीकरण

गळके छप्पर, तुटलेल्या खिडक्या, रंग उडालेल्या भिंती असे महापालिकेच्या शाळांचे सर्वसाधारण चित्र. निधीची कमतरता, हे या अवस्थेमागचे मुख्य कारण असते. मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळाही त्याला अपवाद नाहीत. परंतु हे चित्र आता बदलू लागले आहे. व्यावसायिक सामाजिक दायित्वाअंतर्गत विविध खासगी कंपन्यांकडून मिळणाऱ्या निधीतून पालिकेच्या शाळा आता कात टाकू लागल्या आहेत.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या एकूण ३५ शाळा आहेत. या शाळांत सुमारे ८ हजार विद्यार्थी शिकतात. महापालिका शाळांचा उल्लेख केल्यानंतर डोळ्यांसमोर उभे राहणारे दयनीय चित्र पुसून काढण्याचा प्रयत्न सध्या पालिकेने सुरू केला आहे. साखळी बाजारांमधील एक मोठी कंपनी असलेल्या ‘डी मार्ट’च्या माध्यमातून महापालिका शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या महापालिकेच्या १४ शाळांमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. शाळेची रंगरंगोटी करण्यापासून ते त्यात अद्ययावत संगणक कक्ष उपलब्ध करण्यापर्यंतच्या सुविधा याद्वारे निर्माण केल्या जात आहेत.

प्रत्येक मोठय़ा कंपनीला त्यांच्या नफ्याच्या काही टक्के रक्कम व्यावसायिक सामाजिक दायित्व निधी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) म्हणून खर्च करणे बंधनकारक असते. त्याअंतर्गत मिळालेल्या या निधीतून महापालिकेच्या माशाचा पाडा, चेणा, काशी गाव, भाईंदर, मुर्धा या ठिकाणच्या १४ शाळांचा कायापालट करण्यात येणार आहे. या शाळा आतून-बाहेरून आकर्षक पद्धतीने रंगविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून भिंतींवर सुविचार, संविधान, राष्ट्रगीत, विविध गाणी, विज्ञान, वाचनाचे महत्त्व सांगणारी चित्रे चितारण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक शाळेत अद्ययावत  संगणक प्रयोगशाळा त्यात पुरेसे संगणक, संगणक शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वैज्ञानिक उपकरणांनी आणि माहितीने परिपूर्ण असणारा विज्ञान कक्ष, वाचनालय या सुविधाही उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे.

विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मूल्यमापन

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन आता ऑनलाइन करण्यात येणार आहे. यासाठी एक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून ती लवकरच सर्व शाळांमधील संगणकांत अपलोड केली जाणार आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची दररोज बायोमेट्रिक हजेरी आता घेतली जाणार आहे. त्यांचा दररोजचा शैक्षणिक अहवाल, परीक्षांचे निकाल या संगणक प्रणालीत नोंदवले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन यामुळे शक्य होणार आहे.

ध्यानधारणेसाठी २० मिनिटे

विद्यार्थी मानसिकदृष्टय़ा सक्षम असतील तर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. महापालिकेच्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांचा बौद्धिक स्तर उंचवावा, यासाठी त्यांना ध्यानधारणा आणि विपश्यनेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या १८२ शिक्षकांना ध्यानधारणेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे शिक्षक आता विद्यार्थ्यांकडून १०-१० मिनिटे ध्यानधारणा करून घेणार आहेत.

  • Tags: mbmc school,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain