महिन्यातून दोन वेळा २४ तास पुरवठा बंद;  लघुपाटबंधारे विभागाचा निर्णय

जिल्ह्य़ातील धरणांमधील पाणीसाठय़ाचे १५ जुलैपर्यंत नियोजन करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने १४ टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आगे. यामुळे जिल्ह्य़ातील शहरांचा पाणी पुरवठा आता महिन्यातून दोन वेळा २४ तास बंद राहणार आहे.

यासाठी ‘स्टेम’ प्राधिकरण, एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाणी पुरवठा बंदसाठी वार ठरवूून देण्यात आले आहेत. त्यानुसार  मंगळवारी कल्याण-डोंबिवली शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे जिल्ह्य़ातील नागरिकांपुढे पाणी संकट उभे राहिले आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून विविध शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. गेल्यावर्षी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणे भरून वाहू लागली होती. त्यामुळे जिल्ह्य़ाची पाणीचिंता मिटल्याचे चित्र होते. मात्र, नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यातील दुसऱ्या आठवडय़ापासून जिल्ह्य़ावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. ठाणे पाटबंधारे विभागाची बैठक गेल्या आठवडय़ात पार पडली. यावेळी स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आंध्र आणि बारवी धरणातील पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात आला. सद्यस्थितीत दोन्ही धरणामध्ये एकूण ३५७.२८ दलघमी (दशलक्ष घनमीटर) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी महिन्यातून दोनदा २४ तास पाणी कपात लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित महापालिकांना पाणी कपातीचे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. अंबरनाथ आणि बदलापूरमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रत्येक महिन्याच्या दुसरा आणि चौथा आठवडय़ातील सोमवारी पाणी कपात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रातील पाणी साठय़ाचे जुलै महिन्यापर्यंत नियोजन करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पाणी कपात लागू करण्यात येते. मात्र, यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत पाणी कपात लागू झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. असे असले तरी जानेवारी महिन्यापासून पाणी कपात लागू झाल्याने नागरिकांना आता पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठाणे, नवी मुंबई, मिरा—भाईंदर, कल्याण—डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, तळोजा आणि बदलापूरच्या काही भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. तर, ठाणे, भिवंडी, मिरा-भाईंदर भागात स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेटमधील काही भागात एमआयडीसीचा तर, ठाणे शहरात स्टेमचा पाणी पुरवठा होतो. या सर्वच भागांना गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून त्यात आता त्यांच्यावर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे.

मुंबईसाठी पुरेसा साठा; कपात नाही

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या पुरेसा साठा असून पाणी कपात करण्यासारखी परिस्थिती नाही, असे पालिकेचे जल अभियंता अजय राठोर यांनी दिली. गेल्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरला सातही तलावांत मिळून ९८ टक्के साठा  होता. तुलसी, विहार, मोडक सागर, तानसा हे चार तलाव शंभर टक्के भरून वाहू लागले होते. तर ऊध्र्व वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे तीन तलाव ९८ टक्के भरले होते.

कपातीचे दिवस

* एमआयडीसी, अंबरनाथ – शुक्रवार

(जांभूळ व शहाड उदंचन केंद्र)

* कल्याण डोंबिवली पालिका

(बारावे व मोहिली उदंचन केंद्र)- मंगळवार

* स्टेम प्राधिकरण – बुधवार

* म. जी. प्र – सोमवार

(अंबरनाथ, बदलापूर)