कळवा येथील महात्मा फुलेनगर परिसरात शुक्रवारी सकाळी कमलकांत सैनी (१९) याने एका १४ वर्षीय मुलीवर बंदुकीतून गोळी झाल्याची घटना घडली. यामध्ये ती मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मुलीसोबत कमलकांतचे प्रेमसंबंध असून तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. त्याने तिच्याकडे राजस्थानला येण्याचा आग्रह धरला होता, मात्र तिने नकार दिल्यामुळे त्याने तिच्यावर गोळी झाडल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
जखमी मुलगी कळव्यातील महात्मा फुलेनगर परिसरामध्ये राहते. तिची वर्षभरापूर्वी राजस्थानमध्ये कमलकांत याच्यासोबत ओळख झाली. या ओळखीतून पुढे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यातूनच हा प्रकार घडला. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे. व्ही. बाबर यांनी दिली.