जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी टाकलेल्या छाप्यात शहापूर तालुक्यातून १४६ कोटी रुपये किमतीचा वनस्पती; तसेच इतर खाद्य तेलाचा साठा जप्त केला.
बामणे येथील लिबर्टी खाद्यतेल निर्मिती मिलवर शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात २९ हजार ३४१ मेट्रिक टन तेल जप्त करण्यात आले. लिबर्टी ऑइल मिल वनस्पती तूप आणि पामोलिन तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खाद्यतेल आयात करते. प्रक्रिया करण्यासाठी या तेलांची आवश्यकता असते. अशा तेल आयात करणाऱ्या कंपन्यांना साठय़ाची मर्यादा नसली तरी जप्त करण्यात आलेल्या तेलासंदर्भात कोणतीही कागदपत्रे लिबर्टीच्या व्यवस्थापनाला सादर करता आलेली नाहीत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहन नळदकर यांनी दिली. त्यामुळे साठा जप्त करून व्यवस्थापनास तपशील देण्याविषयी नोटीस देण्यात आली आहे. जप्त केलेला तेलसाठा मिलच्या आवारातच असला तरी योग्य ती कागदपत्रे सादर केल्याशिवाय त्यांना ती वापरता येणार नाहीत.