संगणकीकरणामुळे संगीत क्षेत्रात ध्वनिमुद्रण करणे अधिक सोपे झाले असले तरी या आधुनिकीकरणामुळे कलावंतांचा कस कमी पडू लागल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार-गीतकार अशोक पत्की यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात व्यक्त केली. आचार्य अत्रे कट्टय़ाच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त कट्टय़ावर त्यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली.
 या वेळी  त्यांचे सहकारी गायक मंदार आपटे आणि माधुरी करमरकर या वेळी उपस्थित होते. संगीतकार म्हणून अशोक पत्की यांचा सुरू झालेला प्रवास, त्यांच्या गाण्यांना गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाचा लाभलेला परिसस्पर्श, जीतेंद्र अभिषेकींचा लाभलेला सहवास इथपर्यंतचा प्रवास या गप्पांमधून उलगडत गेला. त्याच्या संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास या वेळी कट्टेकरांसमोर उलगडला.
बेफाम ताप आलेला असतानाही दूरदर्शनवरील कार्यकमासाठी ते गेले. अशा काही आठवणी सांगून येणाऱ्या भावी पिढीसाठी आदर्श असलेल्या व्यक्तीचा जीवनप्रवास ऐकून कट्टेकर भारावून गेले होते. पत्कींनी संगीतबद्ध केलेली आभाळमाया, पिंपळपान, अधुरी एक कहाणी आदी मालिकांची शीर्षकगीते, झंडू बाम, धारा तेल, आदी वस्तूंच्या जाहिरातींचे जिंगल्स, ‘नाविका का रे’सारख्या भावगीतांची सुरेल मेजवानी रसिकांना या वेळी ऐकायला मिळाली.
रसिकांना ‘जिंगल्स’ची मेजवानी
अशोक पत्की यांच्या या कार्यक्रमात उपस्थिती रसिकांना पत्की यांनी संगीतबद्ध जिंगल्स, मालिकागीते यांची मेजवानी मिळाली. आभाळमाया, पिंपळपान, अधुरी एक कहाणी आदी मालिकांची शीर्षकगीते, झंडू बाम, धारा तेल आदींच्या जाहिरातींचे जिंगल्स, ‘नाविका का रे’सारख्या भावगीतांची सुरेल मेजवानी रसिकांना यावेळी ऐकायला मिळाली.