धरणसाठा २५ टक्क्यांवर; जिल्ह्य़ातील अन्य धरणांतील जलसाठय़ातही वाढ
जून महिन्याच्या अखेरीस दहा टक्क्यांच्या आसपास असलेल्या बारवी धरणाच्या जलसाठय़ात १५ टक्क्यांची वाढ झाली असून येथील पाण्याची पातळी २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्य़ातील भीमाशंकर पट्टय़ात चांगला पाऊस झाला आहे. या सगळ्या भागांतून बारवी धरणात पाण्याचे लोट जमा होत असतात. यामुळे बारवी धरणाच्या पाणीसाठय़ात चांगलीच भर पडली. या परिसरात गेल्या २४ तासांमध्ये सुमारे १०३ मिमी इतका पाऊस पडला असून यामुळे आठवडय़ाभरापूर्वी चिंताजनक वाटणारा हा साठा समाधानकारकरीत्या वाढला आहे.
या धरण परिसरात आत्तापर्यंत एकूण ५९९ मिमी इतका पाऊस पडला आहे. या भागातील पावसामुळे बारवी धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. ठाणे जिल्ह्य़ातील भातसा, मोडक सागर, तानसा या धरणांची पाण्याची पातळीही २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची पाण्याची पातळी जून महिन्याच्या अखेरीस १० टक्के एवढीच होती. जिल्ह्य़ातील शहरी पट्टय़ात दमदार पाऊस पडत असताना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे एमआयडीसी तसेच पाटबंधारे विभागातील अधिकारी चिंतेत होते. जूनच्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर बारवीतून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले होते. तरीही बारवीच्या पाण्याची पातळी कमी असल्याने सर्व यंत्रणांना पाणीकपातीचे वेळापत्रक कायम ठेवण्यात आले होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नद्या, झरे, धबधबे खुले झाले. धरणात पाणी जमण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठा यंत्रणांना उल्हास नदीतून १०० टक्के पाणी उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरातील पाणीकपातही बंद करण्यात आली.
tv04
पुणे जिल्ह्य़ात तसेच भीमाशंकर पट्टय़ात पडणाऱ्या पावसावर बारवी धरणातील पाणीसाठा अवलंबून असतो. भीमाशंकर पट्टय़ातील ओहोळ, नाले यातून येणारे पाणी धरणात साचते. एका दिवसात १०३ मिमी पाऊस पडल्याने धरणाच्या पाणी साठय़ात मोठी वाढ झाली आहे.
४ जुलै रोजी बारवी धरणातील पाण्याची पातळी १८.१३ टक्के होती. ती ५ जुलैला २५.६७ टक्क्यांवर पोहोचली आहे. बारवी धरणात ४६.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. बारवी धरणात ५४.४२ मीटपर्यंत पाणी साठले असून अजून १४ मीटरने पाणीसाठय़ात वाढ झाल्यास धरण भरून वाहू शकणार आहे.