वसईतील मासेमारी करण्यास गेलेल्या २०० बोटींचा संपर्क मंगळवारपासून तुटलेला होता. त्यातील ५० बोटी किनाऱ्यावर सुखरूप आल्या असून अजूनही १५० बोटी समुद्रातच आहेत.

मंगळवारी आणि बुधवारी वसईत अगदी जीवघेण्या पावसाने हजेरी लावली. वसईतील सर्वच भागात कमरेएवढे पाणी साचले होते. पावसामुळे शेतीचे, बागायतीचे, घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये मच्छीमार बांधवही सुटलेला नसून मासेमारी करण्यास खोल समुद्रात गेलेल्या मासेमारी नौकांचा संपर्क तुटलेला आहे. वसई, अर्नाळा, पाचूबंदर, खोचिवडे इत्यादी भागातील एकूण २०० बोटी मासेमारीसाठी दोन ते तीन दिवसांआधी गेल्या होत्या. मंगळवारी पडलेल्या पावसामुळे त्यांच्याशी होणार संपर्क तुटला होता, तरीही बुधवारी सकाळपर्यंत ५० बोटी किनाऱ्यावर सुखरूप पोहचल्या आहेत, परंतु अजूनही १५० बोटींचा संपर्क तुटल्याचे वसई मच्छीमार संस्थेचे संचालक दिलीप माठक यांनी सांगितले. याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि इतर यंत्रणांना कळवण्यात आले आहे, अशी माहिती माठक यांनी दिली.

मासेमारी नौकेवर वीज कोसळली

पाचूबंदर येथील प्रकाश गोरायकर यांच्या मालकीच्या एलरोई या मासेमारी नौकेवर वीज पडून वायरलेस संच, जीपीस व अँन्टेना, डायनीमा,  जळून दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या बोटमालकास खासदार निधीातून मदत द्यावी, अशी मागणी वसई मच्छीमार संस्थेने केली आहे.