करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर १५० खासगी डॉक्टरांना आदेश

वसई : वसई-विरार शहरात करोना संसर्गाचा प्रसार अधिक वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेने आता दीडशे खाजगी डॉक्टरांना पालिकेच्या सेवेत काम करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दिवसाला सरासरी तीनशे नवीन रुग्णांची भर पडत आहे. सध्या शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४ हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यास पालिकेची यंत्रणा अपुरी पडू लागली आहे.

सध्या पालिकेच्या क्षेत्रात विरार येथील बोळींज, वसईतील कौलसीटी, अग्रवाल, नालासोपारामधील रिद्धीविनायक रुग्णालय आणि वसईतील जी जी महाविद्यालयात या ठिकाणच्या विलगीकरण केंद्रात करोनावर उपचार केले जात आहेत. तर अतिसंवेदनशील संपर्कातील रुग्णांना अलगीकरण करण्यासाठी म्हाडा कॉलनी, विरार येथे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

शहरातील करोनाची स्थिती लक्षात घेता विरार पूर्वेतील विवा महाविद्यालय शिरगाव व चंदनसार येथे कोविड रुग्णालय तसेच वरूण इंडस्ट्रीज वालीव येथे उपचारासाठी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात डॉक्टरांची गरज लागणार आहे. त्यामुळे आता पालिकेने शहरातील नोंदणीकृत असलेल्या खासगी डॉक्टरांना सेवा देण्याचे बंधनकारक केले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी पालिकेने २८ खासगी डॉक्टरांना सेवा देण्याचे आदेश दिले होते. आता पालिकेने आणखीन १५० खासगी डॉक्टर अधिग्रहित केले असून यामध्ये बीएएमएस – ५०, बीएचएमएस – ५०, एमबीबीएस – ५० अशा डॉक्टरांचा समावेश असून तात्काळ सेवा देण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत.

डॉक्टरांनी नकार दिल्यास कारवाई करणार

देण्यात आलेल्या आदेशाचे डॉक्टरांनी पालन न केल्यास व सेवा देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथरोग नियंत्रण अधिनियम याअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.