वसई : टाळेबंदीत काहीशी शिथिलता आणून स्थलांतरीत मजुरांना गावी जाण्याची परवानगी दिल्यानंतर पायी गावी निघालेल्या वसईच्या मच्छीमार बोटींवरील मजुरांना पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री माणिकपूर परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची रवानगी पुन्हा वसईच्या पाचूबंदर भागात करण्यात आली आहे. या परिसरात जवळपास दीडशेहून अधिक परप्रांतिय मजूर अडकले आहेत.

वसईच्या पश्चिमेकडील पाचूबंदर—किल्लाबंदर किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांतील मजूर मासेमारी बोटींवर कामासाठी येतात. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू झाल्यानंतर दीड महिन्यापासून या भागात जवळपास ३००हून अधिक मजूर अडकले आहेत. यापैकी अनेकजण यापूर्वीच पायी वा मिळेल त्या मार्गाने गावाकडे रवाना झाले आहेत. मात्र अद्यापही १५०हून अधिक मजूर या भागात अडकले आहेत.

केंद्र सरकारने टाळेबंदीत काहीशी शिथिलता आणून स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानुसार राज्यांनीही प्रक्रिया सुरू केली आहे. तरीही काही स्थलांतरीत परप्रांतीय मजूर पायी गावी निघाले आहेत. सोमवारी रात्री पाचूबंदर—किल्लाबंदर परिसरातून उत्तर प्रदेशात चालत निघालेल्या जवळपास ९० मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वसई आणि माणिकपूरच्या पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यांची रवानगी पुन्हा पाचूबंदर येथे करण्यात आली आहे. वसई मच्छिमार संस्थेने या स्थलांतरीत मजुरांच्या रात्रीच्या निवाऱ्याची व्यवस्था संस्थेच्या आवारात करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या कुशीनगर या एकाच जिल्ह्यातील जवळपास १००हून अधिक मजूर पाचूबंदर येथे अडकले आहेत.

मजुरांची ऑनलाईन नोंद केलेली आहे. सध्या संस्थेच्या आवारात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष  संजय कोळी यांनी सांगितले.

आमच्याकडे मजुरांची जी माहिती आली आहे, त्यावर काम सुरू आहे. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यावर या मजुरांची त्वरित त्यांच्या राज्यात रवानगी केली जाईल.

-किरण सुरवसे, तहसीलदार, वसई

मच्छिमार बोटींवरील ताब्यात घेतलेल्या मजुरांची माहिती आम्ही जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना दिलेली आहे. या मजुरांच्या रितसर रवानगीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

-विजयकांत सागर, अपर पोलीस अधीक्षक