करोना संसर्ग रोखण्यासाठी डोंबिवलीत वृंदावन गृहसंकुलाचा उपक्रम

डोंबिवली : दीड हजार लोकवस्तीच गृहसंकुल म्हणजे एक लहानसे गावच. या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोसायटी आवारात किराणा, भाजीपाला, बँकांचे एटीएम, खाण्याचे साहित्य रहिवाशांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे टाळेबंदीनंतर सर्व सदस्य संकुलाच्या बाहेर पडलेलेच नाहीत. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक उत्तम आदर्श डोंबिवलीतील राजूनगरमधील वृंदावन गृहसंकुलाने दाखवून दिला आहे. असाच उपक्रम कल्याणमधील शंकलेशा होम्स गृहसंकुलात राबविण्यात येत आहे.

४५ दिवसांपूर्वी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वृंदावन सोसायटीतील ३३१ सदनिकाधारिकांनी प्रवेशद्वारे कुलूपबंद केले. आतील सदस्य बाहेर आणि बाहेरील आत येण्यास निर्बंध घालण्यात आले. दीड हजार सदस्यांनी या निर्बंधाना संमती दिली. सोसायटीचा रखवालदार, माळी, सफाई कामगार यांना करोना संसर्ग प्रतिबंधासाठी जंतुनाशक, मुखपट्टी उपलब्ध करून देण्यात आले. या सेवकांना सोसायटीत राहण्याची, भोजनाची व्यवस्था केली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच सोसायटीबाहेर सोडण्यात येते. आगमनानंतर त्यांनी विलगीकरणाचे सर्व नियम पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सदस्यांना नियमित ताजा भाजीपाला, किराणा, बेकरीचे पदार्थ, दूध उपलब्ध होईल यासाठी व्यापाऱ्यांची साखळी तयार केली. साहित्य कधी उपलब्ध होईल याची माहिती सदस्यांना व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे दिली जाते. हे व्यापारी सकाळी गृहसंकुलाच्या आवारात येऊन जीवनाश्यक सामान विकतात. झुंबड होणार नाही, रांगेत सामान विक्री केली जाते. पैशाची अडचण नको म्हणून फेडरल बँकेने मोबाइल एटीएम सुविधा संकुलात उपलब्ध करून दिली आहे, असे वृंदावन गृहसंकुलाचे अध्यक्ष सचिन खैरे यांनी सांगितले. ४५ दिवसांपासून सदस्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे नियोजन करण्याची जबाबदारी सचिव योगेश अंबुर्ले, प्रशांत महाजन, ज्ञानेश्वर दळवी व इतर सहकारी पार पाडतात. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वृंदावन गृहसंकुलाने राबविलेल्या उपक्रमाचे पोलीस, पालिका प्रशासनांनी कौतुक केले आहे. सामाजिक भान म्हणून वृंदावन मित्र परिवारातर्फे जे. जे. रुग्णालयाला व्यक्तिगत संरक्षण साधने उपलब्ध करून दिली आहेत.

कल्याणमधील शंकलेशा होम्सच्या पदाधिकाऱ्यांनी गृहसंकुलाबाहेर कोणीही पडायचे नाही असा निर्णय घेतला. फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी यामध्ये वगळण्यात आले. सोसायटीचे उद्वाहन नियमित जंतुनाशक फवारणीने स्वच्छ केले जाते. सुरक्षारक्षकावर ही जबाबदारी आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहे. घरपोच सेवेतून सदस्यांना जीवनाश्यक सामान, औषधे, मासळी मिळेल अशी व्यवस्था केली आहे. सदस्य बाहेरून आत आला की त्याने साथसोवळ्याचे सर्व नियम पाळण्याचे बंधन घातले आहे. या संकुलातील निवासी कल्याण-डोंबिवली पालिका सचिव संजय जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने करोना संसर्ग रोखण्याचे नियम सदस्यांकडून काटेकोर पाळले जातात.