16 October 2019

News Flash

प्रवाशांकडून रूळ ओलांडणे थांबेना!

गेल्या वर्षी रूळ ओलांडणाऱ्या २ हजार ७४३ जणांवर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली.

(संग्रहित छायाचित्र)

२०१८ मध्ये १५१ प्रवाशांचा रूळ ओलांडताना मृत्यू; रेल्वेच्या जनजागृतीचाही उपयोग नाही

वसई : रेल्वे प्रवाशांनी रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वेतर्फे विविध उपाययोजना करूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. रेल्वे रूळ ओलांडताना २०१८ या वर्षांत तब्बल १५१ जणांना आपला जीव गमवावा लागला, तरीही हे प्रमाण थांबलेले नाही.

रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदा नव्हे तर धोकादायकही आहे. मात्र लवकर पोहोचण्यासाठी, जिने ओलांडायचा कंटाळा येतो म्हणून अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असतात. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढलेले आहे. २०१८ या वर्षांत मीरा रोड ते डहाणूदरम्यान झालेल्या अपघातांत २४६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी १५१ प्रवाशांचा मृत्यू रूळ ओलांडताना झाला. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातर्फे विविध मोहिमा राबिवल्या जातात. रेल्वेनेही प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पूल, सुरक्षारक्षक जाळी, पादचारी उड्डाणपूल भुयारी मार्ग बनवले आहेत; परंतु प्रवाशांची रूळ ओलांडण्याची सवय बंद होण्याची चिन्हे दिसत नाही.

गेल्या वर्षी रूळ ओलांडणाऱ्या २ हजार ७४३ जणांवर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली. त्यामध्ये ८ लाख ३८ हजार ९५० दंडाची वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बल यांच्या वतीने देण्यात आली आहे.

वेळोवेळी रेल्वे रूळ ओलांडणे धोकादायक आहे, असे सांगत जनजागृती मोहिमा हाती घेतो, त्यांच्यावर कारवाई करतो, मात्र प्रवासी रूळ ओलांडत असतात, अशी माहिती विरार रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख जी. एन. मल्ल यांनी दिली.  प्रवाशांना ये-जा करण्यासाठी जिन्याची सुविधा असतानाही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावरही कारवाई केली जाणार आहे, असे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले .

First Published on January 12, 2019 1:28 am

Web Title: 151 commuters killed in vasai while crossing the railway track in 2018