ठाणे जिल्ह्य़ात करोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून शुक्रवारी १५४ नव्या करोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये ठाणे शहरात एका दिवसात सर्वाधिक ५१ रुग्ण आढळले. नवी मुंबई ४३, कल्याण डोंबिवलीत २७, मीरा-भाईंदर २१, ठाणे ग्रामीण ७, बदलापूर ४ आणि भिवंडीत एक रुग्ण आढळला. नवी मुंबईत शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला.

ठाणे जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या १ हजार ८०९ इतकी झाली. जिल्ह्य़ात ठाणे आणि नवी मुंबई या दोन शहरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून शुक्रवारी ठाण्यात ५१ तर नवी मुंबईत ४३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली येथे शुक्रवारी २७ नवे रुग्ण आढळून आले असून शहरातील एकुण रुग्ण संख्या २८० इतकी झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये २१ नवे रुग्ण आढळून आल्याने तेथील बाधितांचा आकडा २२३ झाला आहे. बदलापूरमध्ये शुक्रवारी ४ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने शहरातील करोनाबाधितांची संख्या आता ४६ वर पोहोचली आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात एका रुग्णाची नोंद करण्यात आली.

नवी मुंबईत दोघांचा मृत्यू : नवी मुंबईतील दोन रुग्णांचा शुक्रवारी मृत्यू झाला असून जिल्ह्य़ात आत्तापर्यंत ४६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी उल्हासनगर आणि अंबरनाथ मध्ये एकही नव्या रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

वसईत १४ नवे रुग्ण, बाधितांची संख्या १९१

वसई : गेल्या २४ तासांत वसई शहरात १४ रुग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. शुक्रवारी नालासोपाऱ्यात १०, तर वसई आणि विरारमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले. यात दोन हॉटेल कर्मचारी, २ डॉक्टर, मुंबईत वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, बेस्ट चालक आदींचा समावेश आहे.

कळवा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांवर कारवाई

करोनाबाधित मृतांचे चाचणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला होता. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर हे दोघेजण करोनाबाधित असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अंत्ययात्रेला गेलेल्या अनेकांना करोनाची लागण झाली होती. या प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांचा पदभार काढून घेतला. या पदावर इतर दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.