ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव पोलिसांमध्ये वाढत असला तरी ठाणे शहर पोलीस दलातील ६२ टक्के पोलीस करोनामुक्त झाले आहेत. पोलीस दलातील २४६ पैकी १५४ करोनाबाधित पोलीस बरे झाले असून उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

ठाणे शहर पोलीस दलातील २४६ पोलिसांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये २२२ पोलीस कर्मचारी आणि २४ अधिकाऱ्यांचा सामावेश आहे. यातील सर्वाधिक रुग्ण ठाणे पोलीस मुख्यालयातील असून त्यांची संख्या ४७ आहे. राज्य राखीव पोलीस दलातील २६, मुंब्रा पोलीस ठाण्यातील १९, कळवा पोलीस ठाण्यातील १६, गुन्हे अन्वेषण शाखा आणि नियंत्रण कक्षातील प्रत्येकी १२ पोलीस करोनाबाधित आहेत.

आता पोलीस दलातून दिलासादायक अशी आकडेवारी आली आहे. एकूण बाधीत २४६ पोलिसांपैकी आता १५४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करोनामुक्त झालेले आहेत. उर्वरित ९२ पोलिसांपैकी आठ अधिकारी आणि ८८ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.