ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी आणखी १६ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ३४२ वर पोहचली आहे. आतापर्यंत ९ रुग्णांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत.

मंगळवारी प्राप्त झालेल्या १६ पॉजिटीव्ह अहवालांपैकी ९ रुग्ण हे याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. ६ रुग्ण हे अत्यावश्यक सेवेसाठी रोज बदलापूर वरुन मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. तर एका रुग्णाचा शहराबाहेर प्रवासाचा इतिहास नसतानाही त्याला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. गेल्या काही दिवसांत शहराबाहेर प्रवास न करताही लागण झालेले रुग्ण सापडत असल्यामुळे प्रशासनासमोरील चिंतेत वाढ होत आहे.

आतापर्यंत १६७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले असून १६६ रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अद्याप ४५ जणांचा अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. बदलापूर शहरातील अनेक व्यक्ती या अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहे. यामुळेच शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचं समोर आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने ७० रहिवासी संकुल प्रतिबंधीत केली आहेत.