महापालिकेकडून निविदा; दोन वर्षांपासून कागदावर असलेला प्रकल्प अखेर मार्गी

श्री स्थानक ते ठाणे आणि पुढे ठाणे ते नवे ठाणे असा ठाण्याचा अनेक दशकांचा इतिहास उद्यान प्रतिकृतींच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत गेल्या दोन वर्षांपासून कागदावर असणारा हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेने सुमारे १६ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. मानपाडा परिसरातील एका विस्तीर्ण भूखंडावर या ‘ठाणे थीम पार्क’ची उभारणी केली जाणार असून एवढी मोठी रक्कम खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या उद्यानाच्या संकल्पनेविषयी आतापासूनच जुन्याजाणत्या ठाणेकरांमध्ये उत्सुकता व्यक्त होऊ लागली आहे.

ठाण्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. या शहराचे वेगळे अस्तित्व जोपासणाऱ्या पाऊलखुणा आजही जागोजागी दिसतात. सुमारे शंभर वर्षांपूर्वी येथून धावलेली पहिली लोकल ट्रेन, मासुंदा तलाव, कोपिनेश्वर मंदिर अशा काही ठळक खुणा आजही ठाणेकरांसाठी मानिबदू ठरल्या आहेत. ठाणे, कळव्याच्या वेशीवर उभारण्यात आलेले ठाणे कारागृहदेखील याच ऐतिहासिक परंपरेचा आणि वास्तुखुणेचा एक भाग आहे. ठाण्याच्या वाटचालीचा हा इतिहास एखाद्या मोठय़ा उद्यानाच्या माध्यमातून जतन केला जावा यासाठी घोडबंदर परिसरात थीम पार्क उभारणीची संकल्पना दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आली. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी या संकल्पनेस मंजुरी दिली आणि यासंबंधीचा ढोबळ आराखडाही तयार करण्यात आला. नव्या ठाण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या घोडबंदर मार्गावरील मानपाडा परिसरातील विस्तीर्ण भूखंडाची या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निवड करण्यात आली. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेमार्फत प्रयत्न केले जात होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतरही यासंबंधी फारशी हालचाल होताना दिसत नव्हती.

दरम्यान, राज्याच्या पर्यटन विभागाकडून या प्रकल्पासाठी निधी देण्यास फारशी अनुकूल पावले पडत नसल्याचे लक्षात आल्याने महापालिकेने अखेर स्वत:च्या तिजोरीतील १६ कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे सविस्तर आराखडे तयार करण्यात आले असून त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता रतन अवसरमल यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली. पावसाळ्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा विचार असून काही दिवसांत यासंबंधीचे चित्र स्पष्ट होऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला.

घोडबंदरचा प्रवासही..

या थीम पार्कमध्ये जुन्या ठाण्यापासून नव्या ठाण्यापर्यंतची शहरातील ऐतिहासिक स्थित्यंतरे टिपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मूळ शहरापासून अगदी नव्याने वसलेल्या घोडबंदरची वाढती वस्ती आणि अरुंद रस्त्यांचे ते नव्या गगनचुंबी संकुलाचे घोडबंदरचा प्रवासही या उद्यानात रेखाटला जाणार आहे.