सागर्ली येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या एमआयडीसी अभियंता व पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला महेश पाटील व त्याच्या १६ साथीदारांची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जामिनावर सुटका केली.

२२ डिसेंबरला सागर्ली येथील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी पोलीस फौजफाटय़ासह गेले होते. त्यावेळी नगरसेवक महेश पाटील याने बांधकाम पाडण्यास अटकाव केला. यावरून झालेल्या बाचाबाचीतून दगडफेकीची घटना घडली होती. यात अभियंता व पोलीस जखमी झाले होते. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाटील याच्यासह १६  जणांना अटक केली होती. सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर या सर्वाची सुटका केली, अशी माहिती मानपाडा पोलिसांनी दिली