05 March 2021

News Flash

‘टीएमटी’चे सक्षमीकरण

२०० नव्या बस खरेदीचा, आगार विकासासाठी १६० कोटींचा प्रस्ताव

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा यांसारख्या उपनगरांमधील अंतर्गत वाहतुकीची धमनी समजल्या जाणाऱ्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी व्यवस्थापनाने महत्त्वाकांक्षी असा बस खरेदी आणि आगार विकासाचा प्रस्ताव आखला आहे. त्यानुसार २०० नव्या बसची खरेदी आणि आगार विकासासाठी १६० कोटी रुपयांचा सविस्तर असा प्रस्ताव तयार करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या योजनेच्या माध्यमातून हा निधी उभा केला जाणार आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमामार्फत हद्दीत आणि हद्दीबाहेर अशा एकूण १०४ मार्गावर प्रवासी सेवा पुरविली जाते. दररोज सरासरी दोन लाखांहून अधिक प्रवासी या बसने प्रवास करत असतात. सद्य:स्थितीत परिवहन उपक्रमाकडे एकूण ५१७ बसचा ताफा असला तरी त्यापैकी २३७ बसचे वयोमान १० वर्षांपेक्षा अधिक आहे.

परिवहन उपक्रमाच्या एका अहवालानुसार ५१७ बसपैकी ३१५ बसेस प्रत्यक्ष संचालनासाठी दररोज उपलब्ध होत असतात. दैनंदिन दुरुस्ती अथवा नादुरुस्त बसचे प्रमाण जवळपास २०० मोठे असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची उपलब्धता असूनही म्हणाव्या त्या प्रभावाने सेवा पुरविणे टीएमटी प्रशासनाला अजूनही शक्य झालेले नाही.

नव्या खरेदीचा प्रस्ताव

वाढती प्रवासी संख्या आणि अपुरी सेवेचे दुखणे लक्षात घेता टीएमटी व्यवस्थापनाने केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा करत २०० नव्या बसखरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. करोनाकाळाची आर्थिक आव्हाने सामोरे असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने यासंबंधी आखलेल्या एका योजनेचा हवाला देत हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एक बस खरेदीसाठी सरासरी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरत १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याशिवाय एका मोठय़ा बस आगाराच्या विकासासाठी २० कोटी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ४० कोटी असा एकूण १६० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे. बस खरेदीसाठी केंद्र सरकारकडून ६० कोटी रुपयांचा हिस्सा अपेक्षित धरण्यात आला आहे. राज्य सरकार आणि महापालिकेने उर्वरित ४० कोटी रुपये उभे करायचे आहे. ही वाटणी कशी असेल हे राज्य सरकारची सुकाणू समिती निश्चित करेल, असे ठरविण्यात आले आहे. आगार विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून २४ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित धरण्यात आला आहे.

जुन्या बसचे दुखणे

परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील ९ ते १० वर्षे आयुर्मान असलेल्या टाटा मेक कंपनीच्या डिझेल आणि सीएनजी इंधनावरील २३७ बसपैकी २७ टक्के म्हणजेच ६५ बस प्रत्यक्ष संचालनासाठी उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने सध्या बीएस-७ नामांकन लागू केल्यामुळे या २३७ बसचे सुटे भाग सहजरीत्या बाजारात उपलब्ध होत नाहीत, असे टीएमटी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यामुळे दुरुस्तीचा कालावधी वाढतो आणि सेवा पुरविण्यात अडचणी उभ्या राहतात, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि आसपासच्या शहरांमधील प्रवासी वाहतुकीची गरज लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर तो पुढे राज्य आणि केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. केंद्र सरकारने बस खरेदी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजना आखली असून त्यानुसारचा हा प्रस्ताव तयार केला आहे.

– संदीप माळवी, परिवहन व्यवस्थापक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 12:22 am

Web Title: 160 crore proposal for purchase of 200 new tmt buses depot development abn 97
Next Stories
1 तीन मुलांसह महिला मृतावस्थेत
2 कबुतरखान्यांवरून वाद!
3 कडोंमपाचे भव्य मुख्यालय कचोरेत?
Just Now!
X