पराभूत उमेदवारांच्या पुनर्वसनासाठी हालचाली
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती सदस्य निवडीसाठी अखेर मुहूर्त सापडला असून त्यासाठी १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाई (एकतावादी) या पक्षातील उमेदवारांचा समावेश आहे. परिवहन सदस्यपदाकरिता १२ जागा असल्याने तिथे आपली वर्णी लागावी म्हणून अर्ज भरणाऱ्या १७ उमेदवारांनी आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी मिळू शकलेली नाही, अशा उमेदवारांना परिवहन समिती सदस्यपदाचे गाजर पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले होते. याच निवडणुकीत पराभूत झालेल्या दिग्गज नगरसेवकांचेही राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांची समितीवर निवड करण्याच्या हालचाली सर्वच राजकीय पक्षात सुरू होत्या. महापालिका निवडणुकीनंतर परिवहन समिती सदस्यपदाची निवड प्रक्रिया काही तांत्रिक कारणास्तव रखडली. तसेच कार्यकाळ संपल्याने सहा सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे समितीमध्ये शिल्लक असलेल्या सहा सदस्यांमधूनच सभापती निवडणूक घेण्यात आली. त्यात शिवसेना उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. वर्षभरापूर्वी सभापती तसेच अन्य सदस्यांचाही कार्यकाळ संपल्यामुळे समितीवर नवीन सदस्यांची नियुक्ती होऊ शकली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या विशेष समितीच्या माध्यमातून परिवहनचा कारभार सुरू आहे. त्यामुळे परिवहन समिती सदस्यपदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांकडून ही निवड प्रक्रिया उरकण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह सुरू होता.

इच्छुक उमेदवार
ठाणे परिवहन समितीमध्ये एकूण १२ सदस्य निवडून येतात तर स्थायी समिती सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात. या १२ जागांसाठी शिवसेनेतर्फे पवन कदम, साजन कासाय, अनिल भोर, प्रकाश पायरे, राजेंद्र महाडिक, जेरी डेव्हिड, दशरथ यादव आणि संजय भोसले यांनी पालिका सचिव मनीष जोशी यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीतर्फे सुरेंद्र उपाध्य, हेमंत धनावडे, तकी चेऊलकर, सुधाकर नाईक आणि युनिस शेख यांनी अर्ज भरले आहेत. काँग्रेसतर्फे शैलेश शिंदे आणि सचिन शिंदे यांनी अर्ज भरले आहेत. मनसेतर्फे राजेश मोरे तर रिपाई (एकतावादी) उत्तम खडसे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. १२ एप्रिलला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.