ठाणे जिल्ह्य़ातील रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही ताण; कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईपाठोपाठ ठाण्यातही रुग्णस्थिती गंभीर

ठाणे : ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात आटोक्यात आलेला करोनाचा संसर्ग गणेशोत्सवानंतर पुन्हा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ात दररोज १ हजार ७०० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस १२ हजारांपर्यंत खाली घसरलेली सक्रिय करोना रुग्णांची संख्या आता पुन्हा १७ हजारांच्या वर पोहोचली आहे.

रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे जवळपास सर्वच शहरांमधील आरोग्य व्यवस्थेवरचा ताण पुन्हा वाढला असून रुग्णालयांच्या खाटा मिळण्यातही अडचणी येत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ऑगस्ट महिन्यामध्ये दररोज १ हजाराहून कमी करोना रुग्ण आढळून येत होते. त्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे सक्रिय करोना रुग्णांची संख्या १२ हजारांपर्यंत खाली आली होती. जिल्ह्य़ातील नवी मुंबई वगळता इतर शहरांमध्ये आढळणाऱ्या करोना रुग्णांचे प्रमाण घटल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताणही कमी झाला होता. अतिसंक्रमित क्षेत्रातील संसर्गही आटोक्यात येत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र होते. गणेशोत्सव संपताच हे चित्र पालटले आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांत तसेच ग्रामीण भागांमध्ये मिळून दररोज सरासरी १ हजार ७०० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या रविवार सायंकाळपर्यंत १ लाख ४६ हजार १०२ वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे सक्रिय करोना रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून सद्य:स्थितीत १७ हजार ७८५ सक्रिय करोना रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. सर्वाधिक ५ हजार २६९ सक्रिय रुग्ण हे एकटय़ा कल्याण-डोंबिवली शहरातील आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबई शहरात ३ हजार ५१७ सक्रिय करोना रुग्ण आहेत. ऑगस्ट महिन्यात ठाणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ७०० पेक्षाही कमी होते. शहरातील सक्रिय रुग्णांचे हेच प्रमाण आता दुपटीने वाढले असून ठाणे शहरात सध्या ३ हजार ४६५ सक्रिय करोना रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार १३०, मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ९३९, उल्हासनगरमध्ये ५११, बदलापूरमध्ये ३८०, अंबरनाथमध्ये ३५२ आणि भिवंडी शहरात २२१ सक्रिय करोना रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरातील करोना रुग्णालयांच्या खाटा भरू लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरचा ताण वाढू लागला आहे.

कल्याण-डोंबिवलीत दररोज ५०० हून अधिक रुग्ण

सुरुवातीचा काही काळ सोडला तर कल्याण डोंबिवलीत करोनाचा कहर अजूनही कायम आहे. महापालिकेची विस्कळीत यंत्रणा, राजकीय वरदहस्तामुळे गाफील राहिलेले अधिकारी आणि साथ नियंत्रण मोहिमेतील सावळागोंधळामुळे या दोन्ही शहरांची अक्षरश: दैना उडाली आहे. मध्यंतरी आसपासच्या शहरांमध्ये करोनाचा संसर्ग कमी होत होता. तेव्हाही डोंबिवलीतील रुग्णांचा आकडा नियंत्रणात आणण्यात महापालिका प्रशासनाला यश आले नव्हते. गेल्या आठवडय़ाभरापासून कल्याण डोंबिवली शहरात ५०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. शहरात दररोज वाढणाऱ्या या रुग्णांमुळे नागरिकांकडून महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शहर                 ५ सप्टेंबर रोजी              १३ सप्टें. रोजी 

                         सक्रिय रुग्ण                 सक्रिय रुग्ण

कल्याण-डोंबिवली    ३६४२                     ५२६९

नवी मुंबई                ३६६६                     ३५१७

ठाणे                       २३८५                      ३४६५

ठाणे ग्रामीण          १५५६                        २१३०

मीरा-भाईंदर         १७३५                        १९३९

उल्हासनगर          ४६३                          ५११

बदलापूर               ३८५                          ३८०

अंबरनाथ             ३२५                           ३५२

भिवंडी                 १५२                            २२१