२४ मार्चपर्यंत सुरू राहणार; आरक्षणासाठी झुंबड

ठाणे : होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी या एसटी आगारांतून विशेष फेऱ्यांची व्यवस्था केली आहे. १६ मार्चपासून या वाढीव फेऱ्या सुरू झाल्या असून २४ मार्चपर्यंत एकूण १७८ जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. या बसगाडय़ांत आरक्षण मिळवण्यासाठी झुंबड उडाली आहे.

होळीनिमित्त मुंबई-ठाण्यातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी एसटी आगारातून कोकणात जाण्यासाठी महामंडळाने जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ठाणे विभागातून १६ ते २४ मार्चदरम्यान दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाड, चिपळूण, गुहागरच्या दिशेने या फेऱ्या होणार आहेत. मंगळवार ते गुरुवापर्यंत या जादा फेऱ्यांची संख्या प्रतिदिन २० ते २५ इतकी असेल, असे एसटी महामंडळाने सांगितले.

दारापर्यंत सेवा मिळत असल्यामुळे अनेकांनी या जादा फेऱ्यांचे आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आगारातून ३०, कल्याणमधून ७ आणि विठ्ठलवाडी आगारातून ९ अशा एकूण ४६ बसगाडय़ा दररोज धावणार आहेत. ठाण्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे महसूल वाढेल, अशी माहिती एसटी महामंडळातील एका अधिकाऱ्याने दिली.

परतीच्या आरक्षणास उशिरा सुरुवात

होळीला जादा गाडय़ा सोडण्यात आल्या तरी अनेकदा परतीच्या प्रवासासाठी आरक्षण लवकर सुरू करण्यात येत नाही. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. ‘माझ्या कुटुंबीयांना परतीचे तिकीट काढायचे होते. मात्र, एसटी महामंडळाने परतीचे आरक्षण सुरू नसल्याने आम्हाला रेल्वेवर अवलंबून राहावे लागले,’ असे संतोष निकम या प्रवाशाने सांगितले.