ठाकुर्ली येथील बारा बंगला भागातील १७९ जुनी झाडे तोडण्याच्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावाला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने बुधवारी मंजुरी दिली. गेल्या दहा महिन्यांपासून हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना सदस्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. मात्र, वृक्ष प्राधिकरण समितीमधील काही सदस्य, पर्यावरणप्रेमी तसेच या भागातील रहिवाशांचा त्यास तीव्र विरोध होता. असे असताना महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पुन्हा एकदा मांडताच तो बहुमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे.
ठाकुर्ली येथील ६५ एकर जागेच्या परिसरातील जुनाट २५० वृक्ष तोडण्याची परवानगी रेल्वेकडून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मागण्यात आली होती. बारा बंगला परिसर हा डोंबिवली, कल्याण परिसरांतील एकमेव हरितपट्टा आहे. शहर परिसरातील नागरिक सकाळ, संध्याकाळ या भागात शतपावली करण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणची झाडे तोडण्यास ठाकुर्ली-चोळेचे नगरसेवक श्रीकर चौधरी, पर्यावरणप्रेमी मनोज वैद्य, अनंत सोनवणे यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. तरीही गेल्या दहा महिन्यांत वृक्ष समितीच्या बैठकीत चार ते पाच वेळा २५० झाडे तोडण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून रेटण्यात आला; पण जनमताचा रेटा पाहून शिवसेनेचे पदाधिकारी तसेच तत्कालीन आयुक्त हा प्रस्ताव मंजूर करण्याचे धाडस करीत नव्हते.
महापालिका आयुक्तपदी नव्याने दाखल झालेले ई. रवींद्रन यांनी बुधवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत झाडे तोडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या वेळी रेल्वेने २५० झाडांऐवजी १७९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. रेल्वेला बारा बंगला भागात हॉकी, अॅथलेट्क्सिची मैदाने विकसित करायची आहेत. राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ही परवानगी देणे आवश्यक आहे, असे आयुक्त ई. रवींद्रन यांनी समितीच्या बैठकीत सांगितले. याला समितीतील काही सदस्यांनी विरोध केला. मात्र, शिवसेनेचे विश्वनाथ राणे, पप्पू पिंगळे, सारिका चव्हाण, सुनील पावशे यांनी प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दिला. त्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

लपूनछपून झाडे तोडली
मध्य रेल्वेची कुर्ला, लोणावळा, कल्याण भागांत हजारो एकर जमीन आहे. त्या भागांत त्यांनी खेळाचे मैदान विकसित करणे आवश्यक होते. बारा बंगला भागातील २५० झाडे तोडण्यावर रेल्वे प्रशासन ठाम होते. रेल्वेने या भागांतील जुनाट झाडांभोवतीची माती काढून त्यांना यापूर्वीच मारण्याचा प्रयत्न केला आहे. आता अधिकृतपणे ते १७९ झाडांवर कुऱ्हाड चालवून या भागातील पर्यावरणाचा ऱ्हास सुरू करणार आहेत.
– श्रीकर चौधरी, नगरसेवक, ठाकुर्ली