बदलापूरजवळ चावीच्या आकाराची वैशिष्टय़पूर्ण विहीर
चिमाजी अप्पांच्या काळातील विहिरीला आजही बारमाही पाणी
पावसाने ओढ दिल्यामुळे यंदाच्या वर्षी पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केल्याने अनेक शहरांत जुन्या विहिरी पुनरुज्जीवित करण्याची मोहीम सुरू असताना बदलापूरजवळील देवळोली येथे चक्क १७ व्या शतकातील विहीर सापडली असून तिला बारमाही पाणी असते. विशेष म्हणजे, या विहिरीचा आकार चावीसारखा असून तिची रचनाही अतिशय आकर्षक आहे.
बदलापूरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळोली गावात असलेली चावीच्या आकाराची ही दगडी विहीर आहे. बदलापूरमधील हौशी अभ्यासक सचिन दारव्हेकर यांनी या वैशिष्टय़पूर्ण विहिरीची छायाचित्रे काढून समाज माध्यमाद्वारे प्रसारित केली. त्यानंतर इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी गेल्या आठवडय़ात विहिरीची पाहणी करून ती १७ व्या शतकातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. चार शतकांपूर्वीच्या या विहिरीत अजूनही बाराही महिने पाणी असते.
चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीच्या वेळेस कल्याण व पुढे जाण्यापूर्वी त्यांचे सैन्य या भागात तळ करून होते. त्या काळात त्यांनी प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी विहिरी बांधल्या आहेत. त्यातील ही एक विहीर असण्याची शक्यता टेटविलकर यांनी व्यक्त केली. मात्र विहिरीच्या बांधकामावर शिलालेख अथवा सनावळ्या दिसलेल्या नाहीत. सनावळय़ांचे दगड मातीखाली गाडले गेले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विहिरीत आजही स्वच्छ पाणी असून विशेष खोल नसलेल्या या विहिरीचा तळ हा स्पष्ट दिसतो. या विहिरीच्या जवळूनच उल्हास नदी वाहत असल्याने या विहिरीत नैसर्गिक झऱ्यांमुळे पाणी येते.

काय आहे विहिरीत?
ही विहीर पुढून गोल व नंतर निमुळती होत गेली असून तिचा आकार शिविलगाच्या शिळेसारखा किंवा चावीसारखा आहे. यात विहिरीत उतरण्यास पंधरा ते अठरा पायऱ्या असून आत चार-पाच पायऱ्या उतरल्यावर दोन बाजूला दिवे लावण्यासाठी कोनाडे आहेत. तसेच विहिरीच्या मुख्य द्वारावर गणपती व अन्य दोन देवतांच्या मूर्ती असून त्यातील एक मूर्ती शस्त्रधारी आहे. या मूर्तीच्या बाजूच्या भिंतीवर दोन मुखभंग झालेल्या सिंहाच्या मूर्ती आहेत. तसेच या द्वाराची कमान गोलाकार असून त्यावर फुले कोरण्यात आली असून विहिरीचा प्रत्येक दगड हा एकमेकांमध्ये सांधेजोड पद्धतीने अडकवून बसवलेला आहे.