|| कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई विरार शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शहरासाठी डहाणू व्यतीगाव येथील धरणातून १८० दललक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जाणार आहे. खोलसापाडा धरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर या योजनेच्या कामाचे अडथळे दूर झाल्याने वसईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील तीन वर्षांपासून डहाणू व्यतीगाव येथील रखडलेल्या प्रकल्पाच्या कामातील अडचणी दूर असून पाणी प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वसई विरार शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढू लागले आहे. सध्या शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात गेली आहे. सध्या स्थितीत वसई-विरार शहराला सूर्या योजनेच्या दोन्ही टप्प्यांतून २०० दशलक्ष लिटर, पेल्हार १०, उसगाव २० या धरणातून २३० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा दररोज पुरवठा केला जात आहे. लोकसंख्या वाढीचा वेग पाहता पुढील काही वर्षांत पाण्याची मोठी गरज निर्माण होणार आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार पुढील २० वर्षांत वसई विरार शहराची लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज ओळखून पाण्याचे नियोजन करणे गरजेचे झाले होते. त्यामुळे पालिकेने खोलसापाडा धरणाची योजना तसेच डहाणू येथील व्यती गावातील पाणी प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू केले होते. खोलसापाडा धरणातून १२.८१८३ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी उपलब्ध होणार आहे.

डहाणू येथील व्यतीगावात हा पाणी प्रकल्प राबविण्यात येणार होता, परंतु हा प्रकल्प विविध प्रकारच्या अडचणीमुळे रखडला होता. डहाणूमधील व्यतीगाव येथील हा प्रकल्प असून हा सूर्या जलशुद्धीकरण प्रकल्प एमएमआरडीए यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे. परंतु येथील नागरिकांच्या विरोधामुळे या प्रकल्पाचे काम पुढे सरकू शकले नव्हते.
डहाणू येथील प्रलंबित प्रकल्पाचे कामही लवकरच मार्गी लावून वसईला १८० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध करून दिले जाईल असे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नुकतेच वसईतील एका कार्यक्रमात सांगितले होते.
पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात अनेक अडचणी प्रशासनास येत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. यातच या प्रकल्पसाठी काही झाडेही तोडावी लागणार होती. यासाठी वनविभागाने ही याला परवानगी दिल्याने त्यामुळे स्थानिकांचा झाडे कापण्यासाठी असणारा विरोध मावळला. तर दुसरीकडे जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी एकत्र चर्चा करत नागरिकांना विश्वासात घेतले. तसेच नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन चर्चेदरम्यान दिले.