ठाणे : करोनामुळे ठाणे जिल्ह्य़ात रविवारी सहा जणांचा मृत्यू झाला, तर १८२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांची संख्या २ हजार १८८ वर पोहोचली आहे.

रविवारी ठाणे शहरात दोन, नवी मुंबईत दोन, तसेच भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्य़ात करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ५८ इतका झालेला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मृतांचा आकडा २५ इतका असून सर्वाधिक मृत्यू याच क्षेत्रात झालेले आहेत.

रविवारी दिवसभरात जिल्ह्य़ातील १८२ नव्या करोनाबाधित रुग्णांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात ४१, नवी मुंबईत ८२, कल्याण १६, भिवंडी चार, अंबरनाथ एक, उल्हासनगर चार, बदलापूर तीन, मीरा-भाईंदर १४ आणि ठाणे ग्रामीण भागात १७ रुग्ण आढळून आले आहेत.