ठाणे : वसंत विहार येथील डी-मार्ट भागात महिन्याभरात १९ भटक्या मांजरींचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मांजरींच्या मृतदेहाभोवती उंदरांना मारण्यासाठी दिल्या जाणाऱ्या विषाची पाकिटे आढळून आली. शवविच्छेदन अहवालातही विष घालून मांजरांना मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या मांजरांना खाद्य पुरविणाऱ्या पूजा जोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डी-मार्ट येथील हिल गार्डन बंगला परिसरात पूजा जोशी राहतात. तीन वर्षांपासून त्या आणि त्यांची मैत्रीण जया नंदा या दोघी भटक्या मांजरांना खाद्यपुरवठा करतात. मात्र २७ जुलैपासून येथील काही मांजरी मरण पावत असल्याच्या घटना घडत होत्या. इतर आजार किंवा कारणांमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा म्हणून पूजा आणि जयाने याकडे दुर्लक्ष केले. मात्र रविवारी आणि सोमवारी एकदम आठ मांजरींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पूजा जोशी यांनी भारतीय जीव-जंतू कल्याण मंडळाचे मानद जिल्हा पशू कल्याण अधिकारी मितेश जैन यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. त्याआधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या मांजरींच्या मृतदेहाभोवती उंदरांना मारण्यासाठी देण्यात येणारे विषाचे पाकीट आढळले आहेत. तसेच सर्वच मांजरांची मृत्यूपूर्वीची लक्षणे सारखीच असून शवविच्छेदन अहवालातही मांजरींचा विषाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती मितेश जैन यांनी दिली.