पालघर पोलीस शिपाई भरतीत १६० जागांसाठी १९ हजारावर अर्ज

डॉक्टर, अभियंते, वकील, वास्तुविषारद, माहिती तंत्रज्ञ आदी पदव्या घेतलेल्या तरूणांना पोलीस शिपाई व्हायचे आहे. पालघर जिल्ह्यत सुरू असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. १६० पदांसाठी १९ हजार अर्ज आले असून त्यात बहुतांश उच्चशिक्षित तरूण आहेत. त्यातली डॉक्टर, अभियंते यांची संख्याही लक्षणीय आहे.

या उमेदवारांची शारिरीक चाचणी सध्या पालघरच्या कोळेगाव येथील मैदानात सुरू आहे. पोलीस शिपायासाठी शैक्षणिक अर्हता ही केवळ १२ वी उत्तीर्ण एवढी आहे. मात्र हजारो उच्चशिक्षित तरुणांनी या पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्याच चक्क डॉक्टर, अभियंते, वास्तुविषारद, वकील, संगीत विषारद आदी पदव्या प्राप्त केलेल्या तरुणांचा समावेश आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने उच्चशिक्षित तरूण परिक्षेसाठी आल्याचे पाहून पोलीस अधिकाऱ्यांना आश्र्च्र्य वाटत आहे. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज केलेल्या तरुणांमध्ये ८ बीएमएम डॉक्टर्स, ३० अभियांत्रिकी पदवी घेतलेले अभियंते, ३ बीटेक, २ वास्तुविषारद, १७ बीएस्सी (कृषी), १२ बीएस्सी (आयटी) १२, १ वकील, ६ बीफार्म  आदी उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे. याशिवाय बहुतांश तरुणानी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. मात्र डॉक्टर्स, अभियंते, आयटी पदवी घेतलेल्या तरुणांनी अशाप्रकारे पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करण्याची ही जिल्ह्यतील पहिलीच वेळ आहे. उच्चशिक्षण आणि पदवी घेऊनही नोकरी मिळत नाही. सरकारी नोकरीची शाश्व्ती आणि इतर फायद्यमुळे उच्चशिक्षित तरूणांचा कल सरकारी नोकरीकडे वाढल्याचे पालघर पोलिसांचे प्रवक्ते हेमंत काटकर यांनी सांगितले

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात उमेदवार तरूण पालघर मध्ये भरतीच्या प्रक्रियेसाठी दाखल झाल्याने पालघर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया युटय़ूबवर थेट प्रक्षेपित केली जात आहे. सकाळी ४ ते दुपारी १२ पर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू असून ती २२ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे, असे पालघर जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले.