बदलापूर शहरात करोना विषाणूचा सामना करताना दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे शहरात करोनामुळे मृत्यूमुखी पावलेल्यांची संख्या १३ वर पोहचली आहे. त्यातच रविवारी २५ रुग्णांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे स्थानिक प्रशासनासमोरची चिंता अधिकच वाढली आहे. आज सापडलेल्या २५ नवीन रुग्णांसह बदलापूर शहराची रुग्णसंख्या ५५२ वर पोहचली आहे.

रविवारी पॉजिटीव्ह आढळलेल्या २५ रुग्णांपैकी १९ व्यक्ती बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या. याव्यतिरीक्त उर्वरित रुग्ण हे अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याचं कळतंय. शहरातील २५९ रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत २८० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. अद्याप ७४ रुग्णांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे आगामी काळात शहरातील रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयासह उल्हासनगर, डोंबिवली, ठाणे, मुंबई येथील विविध रुग्णालयात उपचार केले जात आहेत.