ठाण्यात गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली; तीन लोकांच्या उपस्थितीतच आगमन आणि विसर्जन

ठाणे : गणेशोत्सवाच्या काळात शहरात नागरिकांची गर्दी होऊन करोनाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने उत्सवाकरिता नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये घरगुती गणेशमूर्तीची दोन फूट, तर सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूट उंचीची आणण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय, गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनावेळी जास्तीत जास्त तीनच लोक असावेत तसेच नागरिकांनी घरीच बादलीत, तर मोठय़ा गृहसंकुलामध्ये सिंटेक्सच्या मोठय़ा टाकीमध्ये मूर्तीचे विसर्जन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच अतिसंक्रमित क्षेत्रातील गणेशमूर्ती असेल तर तिच्या विसर्जनासाठी या क्षेत्राबाहेरील परिसरात परवानगी देण्यात येणार नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासनाने दिलेल्या सूचनेच्या आधारे ठाणे महापालिकेने शहरातील गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे टाळावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र, तरीही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला असेल तर हा उत्सव कमी दिवसच साजरा करावा. गणेशमूर्ती चार फुटांच्या मर्यादेत असावी. मंडपामध्ये दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे. मंडपामध्ये भाविकांची थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून तपासणी करून त्यांची नोंद ठेवावी, मंडपामध्ये एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहणार नाहीत. तसेच प्रत्येकाने मास्क लावावे, अशा सूचना पालिकेने केल्या आहेत.

सजावट पर्यावरणपूरक तसेच कमीत कमी असावी, राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करू नये, गणपतीच्या दर्शनासाठी, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादासाठी गृहभेटी टाळाव्यात, विसर्जनस्थळी नागरिकांना कमीत कमी वेळ थांबता यावे यासाठी घरीच श्रीगणेशाची आरती करून विसर्जन घाटावर यावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मंडळांनी केबल नेटवर्क, ऑनलाइन सुविधा किंवा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गणेशदर्शनाची व्यवस्था करावी. तसेच गर्दी टाळण्यासाठी मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद असे कार्यक्रम करू नयेत. त्याचप्रमाणे गर्दी होईल अशा प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित करू नये. आरोग्यविषयक तसेच सामाजिक संदेश असणाऱ्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात, मंडपाची उंची १२ फुटांपेक्षा जास्त असू नये. त्याचबरोबर मंडपामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद करणे मंडळांना बंधनकारक राहणार आहे, अशा सूचनाही पालिकेने केल्या आहेत. या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.

स्वीकृती केंद्रांमध्ये वाढ

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने गणेशमुर्ती दान स्वीकृती केंद्रांमध्ये वाढ केली आहे. गेल्या वर्षी महापालिका क्षेत्रात तीन ठिकाणी स्वीकृती केंद्रे निर्माण करण्यात आली होती. यंदा २० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहेत. तसेच यंदा १३ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती, तर ७ ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्यात येणार आहेत.