चार जखमी; कल्याणजवळील म्हारळ गावातील दुर्घटना

कल्याणमधील म्हारळ गावात लक्ष्मीनगर भागातील डोंगरउतारावर असलेले घर रविवारी पहाटे चाळींवर कोसळल्याने दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चाळीच्या चारही खोल्या गाडल्या गेल्याने मोहम्मद इस्लाम शेख आणि सईद उद्दीन खान या दोन रहिवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसेच चार रहिवाशी या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरूआहेत.

म्हारळ गावातील प्रभाग क्र. १ मधील लक्ष्मीनगर भाग डोंगरउतारावर आहे. बंद झालेल्या दगडखाणींच्या टप्प्यांवर भूमाफियांनी चाळी बांधून त्यांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी या डोंगराच्या पायथ्यावर एक स्लॅबचे घर बांधण्यात आले होते. या घराच्या खालच्या भागात नवीन चाळींची उभारणी करण्यात आली. स्लॅबचे घर आणि चाळी ही नवीन बांधकामे होती.

गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने या डोंगराची माती भुसभुशीत झाली होती. त्यामुळे स्लॅबच्या घरा खालील माती निघून घराला धोका असल्याची जाणीव या घरातील रहिवाशांना झाली होती. त्यामुळे ते घर बंद करून दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते. रविवारी पहाटे पाऊस सुरू असताना स्लॅबच्या घराखालील मातीचा भराव पावसाच्या प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे स्लॅबचे घर त्याच्या खालील भागात असलेल्या चाळींवर कोसळले. चाळीच्या चार खोल्या या घराखाली गाडल्या गेल्याने चाळीतील रहिवाशी ढिगाऱ्याखाली अडकले. जोरात आवाज झाल्याने या भागातील सामाजिक कार्यकर्ते विवेक गंभीरराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ढिगारे उपसून त्याखालील रहिवाशांना बाहेर काढले. या घटनेत दोन रहिवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या प्रकरणाची अपघाती मृत्यू अशी नोंद झाली असून  दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.