ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत आता वाढ झालेली आहे. गुरुवारी ८ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरात तणावाचं वातावरण होतं. यानंतर शुक्रवारी आणखी दोन जणांचे अहवाल हे पॉजिटीव्ह आलेले आहेत. पहिला रुग्ण हा मुंबईच्या केईएम रुग्णालयात लॅब टेक्निशीअन म्हणून काम करतो. सध्याच्या घडीला लॉकडाउन असल्यामुळे…हा रुग्ण रोज बदलापूर ते केईएम रुग्णालय बाईकने प्रवास करायचा.

आपल्या नेहमीच्या प्रवासात लॅबमध्ये काम करत असतानाच या रुग्णाला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल आल्यानंतर लॅब टेक्निशीअनच्या घरातील ४ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलेलं आहे. याव्यतिरीक्त बदलापूरमधील आणखी एक रुग्ण ७ एप्रिलपासून पाठीच्या आजारामुळे सायन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होता. हा रुग्ण ज्या वॉर्डात होता त्या वॉर्डात एकाला करोनाची लागण झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून वॉर्डातील सर्व रुग्णांची चाचणी केली असता या व्यक्तीलाही करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. महत्वाची गोष्ट बदलापुरातील आणखी ७ व्यक्तींचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.

सध्याच्या घडीला बदलापूर शहरातील सुमारे अडीच हजार लोकं, अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत प्रवास करत आहेत. रोजचा बदलापूर ते मुंबई प्रवास यामुळे भविष्यकाळात शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान गुरुवारी, शहरात ८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात ३ जणांना करोनाची लागण झाली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिन्ही रुग्णांना उल्हासनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. नव्याने लागण झालेले करोनाचे आठही रुग्ण हे आधीच्या तिघांशी संबंधित असल्याचं कळतंय.