वसई पोलिसांच्या ‘७१ कलमी कार्यक्रमा’ला यश

बेपत्ता अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी वसईत पोलिसांना ७१ कलमी कार्यक्रम आखला असून या प्रयोगाला यश आले आहे. पहिल्या दहा दिवसांत २० मुलींचा शोध लावण्यात यश आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दररोजचा अहवाल सादर करावा लागत आहे.

अल्पवयीन मुलींना कुणी फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले तर पूर्वी बेपत्ता अशी नोंद व्हायची. २०१३ पासून सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता असेल तर बेपत्ता नोंद करण्याऐवजी अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल करून तपास लावण्याचे आदेश दिले होते, मात्र तरी पोलीस या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहत नव्हते. वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला असता २०१३ पासून ९० मुलींचा शोध लागलाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यांनतर त्यांनी विशेष योजना बनवून अशा मुलींच्या शोधासाठी हा ७१ कलमी कार्यक्रम तयार केला आहे.

अपहृत मुलींचा शोध घेण्यासाठी कुठल्या दिशेने आणि कसा तपास करायचा याची मार्गदर्शिका आणि नियमावली म्हणजेच हा ७१ कलमी कार्यक्रम असल्याचे राजतिलक यांनी सांगितले. कुटुंबाची माहिती, भावंडे, मित्र-मैत्रिणींची माहिती, ती कुठे जात होती, कुणाकुणाशी जास्त बोलायची, कुठल्या क्लासला जात होती, तिला कुणी, कधी त्रास दिला, कुणी एकतर्फी प्रेम करत होते का आदींबाबत तपास करण्याच्या सूचना या ७१ कलमी कार्यक्रमात दिल्या असल्याचे ते म्हणाले.

या योजनेला कमालीचे यश आले असून पहिल्या दहा दिवसांत वसई-विरारमधून बेपत्ता झालेल्या २० मुलींचा शोध घेण्यात यश आले आहे. काही मुलींनी लग्न केली होती, तर काही मुलींवर शारीरिक अत्याचार झाल्याचे आढळून आले.

प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र पथक

हा ७१ कलमी कार्यक्रम राबवण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात सात पोलीस कर्मचारी आहेत. याशिवाय वसई-विरारमधील सातही पोलीस ठाण्यात स्वतंत्र पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचारी या पथकात आहेत. या पथकाने केवळ याच अपहृत मुलींचा शोध घ्यायचा आहे, तसेच रोजचा अहवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना पाठवायचा आहे. राजतिलक दररोज या कामाचा आढावा घेत असून मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे २० मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. ९० मुलींपैकी २० मुलींचा शोध लागला असून अद्याप ७० मुलींचा शोध बाकी आहे. लवकरच या ७० मुलींचादेखील शोध लावला जाईल, असा आशावाद पोलिसांनी व्यक्त केला.