भाजप आमदाराचा भाऊ फरारी, जमावाकडून गाडय़ांची तोडफोड; ३ पोलीस जखमी
भिवंडीत चार दिवसांपूर्वी चॉपरच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विकी ढेपे या बारावीच्या विद्यार्थ्यांचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गाडय़ांची तोडफोड केली तसेच पोलिसांवरही दगडफेक केली. यात तीन पोलीस जखमी झाले असून, तीन पोलिस वाहनांचेही नुकसान झाले. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. भिवंडीतील भाजपचे आमदार महेश चौगुले यांचे चुलत भाऊ राजू चौगुले आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याचा आरोप असून, त्यांच्याविरोधात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आमदार चौगुले यांच्या कार्यालयाची आणि आसपासच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याने भिवंडीत तणावपूर्ण शांतता आहे.
भिवंडीतील वराळदेवीनगर (कामतघर) येथे विकी ढेपे (वय २०) राहत होता. गेल्या आठवडय़ात बुधवारी रात्री विकी आणि त्याचे मित्र देवेंद्र गाडेकर (१७) व सागर साठे (२२) हे याच परिसरात बसले होते. त्यावेळी कारमधून आलेल्या टोळक्याने तिघांवर लोखंडी रॉड आणि चॉपरने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात विकी गंभीर जखमी झाल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर देवेंद्र आणि सागर हे किरकोळ जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणी आमदार महेश चौगुले यांचे चुलत भाऊ राजू चौगुले, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रवी सावंत, आदित्य जाधव, सनी फुटाणकर, अमित गायकर, गोटय़ा टँकरवाला, जयेश मिस्त्री ऊर्फ पप्या, रुपेश कोमलवार ऊर्फ पांडय़ा यांच्यासह अन्य दहा ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी रुपेश आणि जयेशला अटक केली होती, तर अन्य आरोपी फरार आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी विकी धोपेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विकीच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच संतप्त रिपाइं कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून धामणकर नाका, कॉलेज रोड परिसरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन करत निदर्शने केली. जमावाला शांत करण्यासाठी पोलीस आले असता, जमावाने त्यांच्यावरही दगडफेक केली. यामध्ये निजामपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. आर. थिटे, हवालदार एस. एस. शेख, टी. व्ही. कुंभार आदी जखमी झाले. तसेच पोलिसांच्या तीन वाहनांसह सहा वाहनांची तोडफोड जमावाने केली. आमदार महेश चौगुले यांच्या साम्यसाधम्र्यामुळे धामणकर नाका रोडवर असलेली माहेश्वरी समाजाच्या महेश बँकचे एटीएमही संतप्त रिपाइं कार्यकर्त्यांनी फोडले. या घटनेच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. या घटनेमुळे भिवंडीत तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान, रविवारी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांची तेरावीची परीक्षा होती. मात्र बंदमुळे अनेकांना परीक्षेसाठी केंद्रावर जाता आले नाही, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

विकी बारावीचा विद्यार्थी वराळदेवीनगरमध्ये विकी ढेपे त्याची आई सुमन आणि धाकटी बहीण पूजासह राहत असे. पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्याची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. विकी बेन्जो वाजविण्याचे काम करून शिक्षण पूर्ण करत होता.
महिनाभरापूर्वी विशालला मंडई येथे गाठून बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्याच्या पायाचे हाड फॅक्चर झाले होते. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता आणि या प्रकरणात विकी साक्षीदार होता. तो साक्षीदार असल्यामुळेच विकीची हत्या करण्यात आली.
– महेंद्र गायकवाड, शहराध्यक्ष, रिपाइं

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान महिलांची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून विकीची हत्या झाली. या प्रकरणाला आता राजकीय वळण देण्यात येत आहे.
– महेश चौगुले, आमदार