16 October 2019

News Flash

२०० एकर जमीन सिंचनाखाली

ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील आदिवासी भागांत शबरी सेवा समितीचा उपक्रम

पाण्याचे दुर्भिक्ष असलेले आदिवासी पाडे सिंचन योजनेमुळे हिरवेगार झाले आहेत.

ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील आदिवासी भागांत शबरी सेवा समितीचा उपक्रम

भगवान मंडलिक, कल्याण

डोंबिवलीतील शबरी सेवा समितीने  निधी आदिवासी भागातील वर्षांनुवर्षे असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी वापरात आणण्यास सुरुवात केली आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने गाव परिसरातील ओढे, डोंगरी ओहळ्यांचे पाणी अडवून जमीन सिंचनाखाली आणली जात आहे.  मागील काही वर्षांत अशा प्रकारचे गाव, पाडय़ावर राबविलेल्या उपक्रमातून २०० एकर जमीन शबरी समितीने सिंचनाखाली आणली आहे.

गावाखालची जमीन सिंचनाखाली आली तसेच पाणी साठवण क्षमता निर्माण केली की, त्या पाण्याचे महत्त्व शबरी सेवा समितीचे कार्यकर्ते गावक ऱ्यांना पटवून देतात. या पाण्याचा वापर ग्रामस्थ आठ महिने भाजीपाला लागवड, पिण्यासाठी वापरतात. तयार भाजीपाला तालुक्याच्या ठिकाणी, गावालगतच्या मुख्य रस्त्यावर बसून आदिवासी महिला विकतात. त्यामुळे स्थानिक भागात रोजगाराचे नवीन साधन तयार झाले आहे.

ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, रायगडमधील कर्जत भागातील आदिवासी पाडे, नंदुरबार, अक्कलकुवा भागातील आदिवासी पाडय़ांमध्ये डिसेंबरनंतर पाणीटंचाईला सुरुवात होते. पावसानंतरचे उर्वरित आठ महिने आदिवासी वर्ग गाव परिसरात पाणी नसल्याने वीटभट्टी व इतर मजूर कामासाठी मुरबाड, भिवंडी, शहापूर, धुळे भागांत निघून जातात. शबरी संस्थेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर जमीन ओलिताखाली आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने अनेक कुटुंबे या पाण्याचा वापर भाजीपाला लागवड, उन्हाळी पीक घेण्याकडे करू लागली आहेत. पाण्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या रहिवाशांचे प्रमाण घटले आहे, असे शबरी सेवा समितीचे प्रमोद करंदीकर यांनी सांगितले.

उकला आदिवासी पाडय़ातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. गावाच्या बाजूने गेलेला ओढा बांध टाकून अडवला. बाजूच्या अरुंद वाटेला बांध घातला. पाणी अडविल्यानंतर तळे तयार झाले. या तळ्यात पीव्हीसी वाहिन्या टाकून ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविले. एका शेतामधून दुसऱ्या शेतात पाणी देण्याची पद्धत सुरू केली.

पाणी नको असेल तेव्हा पाण्यातील नळवाहिनी बाजूला काढून ठेवली जाते. विजेचा, पाणी खेचणाऱ्या मोटार पंपाचा वापर न करता उकला पाडय़ातील २० एकरहून अधिक शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

या पाण्याच्या माध्यमातून शेतकरी भेंडी, कारली, पडवळ, घोसाळी, काकडी, हरभरा पीक घेण्यास सुरुवात झाली आहे.

 

 

First Published on April 16, 2019 2:41 am

Web Title: 200 acres land bring under irrigation