निवडणूकपूर्व कामांसाठी २०० कोटींची तरतूद

भगवान मंडलिक, लोकसत्ता 

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय व्यवस्थेचा कालावधी पुढील महिन्याच्या अखेरीस संपत आहे. या ठिकाणी प्रशासकीय राजवट अस्तित्वात येण्यापूर्वी महापालिकेने शहरातील जुन्या रस्त्यांना काँक्रिटचा मुलामा देण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत. निवडणूकपूर्व कामांसाठी प्रशासनाने २०० कोटी रुपयांची तरतूद केली असून सत्ताधारी शिवसेनेने यासाठी आग्रह धरला आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या आठ प्रभागांमधील विकास आराखडय़ात प्रस्तावित असलेल्या सर्व महत्त्वाच्या पोहोच रस्त्यांचे सिमेंट-काँक्रिटीकरण केले जाणार आहे. दरवर्षी रस्त्यांवर पडणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात, वाहनकोंडी आणि निधीचा अपव्यय टाळण्यासाठी हे रस्ते काँक्रिटचे केले जात आहेत, असा दावा प्रशासनामार्फत केला जात असला तरी आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वपक्षीय नगरसेवक या कामांसाठी आग्रही असल्याचे वृत्त आहे.

पालिका हद्दीत २० वर्षांपूर्वी नवीन रस्ते झाले. त्यानंतर विकास आराखडय़ातील एकही रस्ता विकसित झालेला नाही. अवजड वाहनांच्या भारांमुळे वाहनकोंडीने गजबजलेल्या या रस्त्यांवर खड्डे पडतात. खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनातर्फे दरवर्षी १३ ते १४ कोटी खर्च केले जातात. खड्डय़ांचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी या वेळी शहर अभियंता विभागाने पालिका हद्दीतील सर्व प्रभागांमधील विकास आराखडय़ातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे हाती घेण्याचे नियोजन केले आहे. प्रभागांमधून जे रस्ते मुख्य वर्दळीच्या रस्त्याला पोहोच आहेत, जे रस्ते दुरुस्त केल्याने प्रभाग, शहरातील वाहतुकीत सुसूत्रता येईल, असे रस्ते या कामांसाठी प्रस्तावित केले आहेत. विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ‘एमएमआरडीए’कडून महापालिकेस ३२ कोटी ७८ लाख रुपये निधी मिळणार आहे. ही सर्व कामे पालिकेने नियोजन करून करायची आहेत. याव्यतिरिक्त ‘एमएमआरडीए’तर्फे पालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांची १२६ कोटी ८२ लाखांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

१०० कोटींच्या अनुदानात रस्तेकाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सर्वागीण विकासासाठी १०० कोटींचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून कल्याण-डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांच्या सिमेंटीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. कोणते रस्ते विकासकामांसाठी घेण्यात येणार आहेत, याचा आराखडा शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. रस्ते आराखडा मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री अनुदानातून मंजूर झालेली कामे सुरू केली जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रभागअंतर्गत विकास आराखडय़ातील मुख्य वर्दळीच्या रस्त्याला पोहोच असणाऱ्या रस्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन करोनापूर्व काळात म्हणजे डिसेंबर-जानेवारीमध्ये केले होते. दरवर्षी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांचा प्रश्न कायमचा निकाली काढणे या दृष्टिकोनातून विचार करून हे रस्ते विकासाचे नियोजन केले आहे.

– सपना कोळी, शहर अभियंता