रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दहा टक्क्य़ांनी घटले 

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली असून यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी महिनाभरातच २५४ वरून ५० दिवसांवर आला आहे. तसेच शहरामध्ये गेल्या महिनाभरात २० हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे गेल्या महिनाभरात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दहा टक्क्य़ांनी घट झाली आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याचे चित्र असून शहराची करोना चिंता वाढली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ८३ हजार ८२६ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७० हजार ६१८ (८४.२४) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सद्य:स्थितीत शहरात ११ हजार ८०३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १ हजार ४०५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. शहरात दररोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येने आता सतराशेचा टप्पा ओलांडला आहे. महापालिका क्षेत्रात महिनाभरापूर्वी म्हणजेच ७ मार्चपर्यंत एकूण ६३ हजार ६८१ इतकी करोना रुग्ण संख्या होती. त्यापैकी ६० हजार ३९४ (९४.८४) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, शहरात केवळ १ हजार ३३९ सक्रिय रुग्ण होते. मात्र, गेल्या महिनाभरात शहरामध्ये २० हजार १४५ इतके नवे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ११ हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दहा टक्क्य़ांनी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून रविवारी दिवसभरात १ हजार ७०१ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्येत वाढ झाल्याने शहराची करोना चिंता वाढली असून त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू लागल्याचे चित्र आहे.

करोना रुग्ण दुपटीचा काळ ५० दिवसांवर

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात करोना रुग्ण संख्येत मोठी घट झाली होती. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी पाचशे दिवसांच्या पुढे गेला होता. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीची नोंद करणे पालिकेने बंद केले होते. मात्र, फेब्रुवारी महिनाअखेर रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्यानंतर पालिकेने पुन्हा रुग्ण दुपटीचा कालावधीची नोंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये ७ मार्चला रुग्ण दुपटीचा कालावधी २५४ दिवस इतका होता. तर, १४ मार्चला रुग्ण दुपटीचा कालावधी १८३ दिवसांवर आला होता. त्यामध्ये आता आणखी घट झाली असून तो आता ५० दिवसांवर आला आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

करोना आकडेवारी

महिनाभरापूर्वी    आता

एकूण रुग्ण                                      ६३,६८१             ८३,८२६

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण               ९४.८४ टक्के       ८४.२४ टक्के

मृत्युदर                                    २.१० टक्के            १.६८ टक्के

रुग्ण आढळण्याचे प्रमाण        ५.५७ टक्के             ६.४७ टक्के

रुग्ण दुपटीचा कालावधी         २५४ दिवस              ५० दिवस

 

ठाणे शहरातील रुग्ण संख्येची आकडेवारी

११,८०३  ठाणे शहरातील सक्रिय रुग्ण

१,९९२ लक्षणे असलेले रुग्ण

९,३६६ लक्षणे नसलेले रुग्ण

४४५ जोखमीचे रुग्ण